कल्याण-डोंबिवली दि.5 जून :
कल्याण डोंबिवलीतील पक्षी प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. पक्ष्यांसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे काही ठिकणी छोटी छोटी अभयारण्य निर्माण करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आज असणाऱ्या जागतिक दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महापालिका डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली. (Environment Day Special: KDMC will set up small sanctuaries for birds)
कल्याण डोंबिवलीत अनेक ठिकाणी टेकड्या असून काही ठिकाणी पाणथळ जागाही आहेत. ज्याठिकाणी थोडे थोडके नव्हे तर तब्बल 259 प्रकारचे पक्षी हजेरी लावतात. जी आपली पक्षी प्रेमी आणि निसर्गप्रेमींच्या दृष्टीने अक्षरशः पर्वणी असते. त्यामुळे अशा भागांचा विकास करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. अशा ठिकाणी पक्ष्यांना बसण्यासाठी, त्यांना खायला फळं मिळतील अशा वृक्षांची लागवड केली जाणार आहे. तसेच सर्व पक्षी मित्र आणि पक्षी प्रेमींच्या मदतीने येणाऱ्या काळात डोंबिवलीमध्ये पक्ष्यांसाठीं छोटे छोटे अभयारण्य निर्माण करणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे येणाऱ्या काळात कल्याण डोंबिवलीमध्ये दुर्मिळ आणि परदेशी पक्ष्यांचा वावर होताना दिसला तर आश्चर्य वाटणार नाही.