उंबर्डेच्या घनकचरा प्रकल्पाभोवती 400 झाडांची लागवड
कल्याण दि.1 जानेवारी :
घनकचरा प्रकल्पातून येणाऱ्या दुर्गांधीवर केडीएमसी प्रशासनाने एक नामी शक्कल शोधून काढली आहे. ग्रीन वॉलच्या माध्यमातून आजूबाजूच्या परिसराला भेडसावणारा हा प्रश्न येत्या काही महिन्यात सुटेल असा विश्वास केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी व्यक्त केला आहे. ऊंबर्डे येथील घनकचरा प्रकल्पाच्या सभोवताली उभारण्यात येणाऱ्या या ग्रीनवॉलला (Green Wall) आजपासून सुरुवात करण्यात आली.
विकास असोसिएट्स आणि त्रिवेणी असोसिएट्स यांचेमार्फत प्राप्त होणा-या सुमारे ४०० कोनोकार्पस या सदाहरित दाट प्रजातीच्या झाडांची लागवड ऊंबर्डे येथील घनकचरा प्रकल्पाच्या सभोवताली करून एक हरित भिंत (Green Wall) उभारण्यात येणार आहे. या हरित भिंतीची देखभाल, दुरुस्ती उंबर्डे घनकचरा प्रकल्प विभागामार्फत केली जाणार आहे. या झाडांच्या लागवडीमुळे या घनकचरा प्रकल्पाभोवती आच्छादन तयार होवून आजूबाजूच्या परिसरात पसरणारी कचऱ्याची दुर्गंधी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.
ऊंबर्डे प्रकल्पात चांगल्या प्रकारच्या टेक्नोलॉजीचा वापर करुन, विस्तृत प्लॅन करुन हा प्रकल्प चांगल्या प्रकारे राबविता येईल, यासाठी नियोजन सुरु असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी दिली.
डोंबिवली येथे कच-यासाठी १०० टिपीडी (१०० टन प्रतिदिन) प्लॅन्टचे बांधकाम सुरू आहे. तिथे आपण विन्ड्रो कंम्पोस्टींग करणार असून, त्याचे काम मार्चअखेरीस संपेल आणि डोंबिवलीतील कच-याची विल्हेवाट स्थानिक पातळीवर लावता येवू शकेल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच कल्याणमधील ऊंबर्डे प्रकल्पावर तयार होणारे खत हे विनामुल्य स्वरुपात बचत गटांना देण्यात येणार आहे. त्यामुळे या खताच्या विक्रीतून महिला बचत गटांचे सक्षमीकरण होईल आणि सेंद्रिय शेतीचे संवर्धन (Organic Farming Promotion) करण्यासही मदत होईल अशी महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिली.
यावेळी महापालिकेचे स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँन्ड ॲम्बेसिडर डॉ. प्रशांत पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, स्थानिक लोकप्रतिनिधी जयवंत भोईर, कार्यकारी अभियंता अनंत मादगुंडी, घन:श्याम नवांगूळ तसेच विविध प्रभागांचे सहाय्यक आयुक्त आणि महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.