कल्याण / डोंबिवली दि.4 जानेवारी :
समाजातील गोर-गरीब आणि गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने स्तुत्य असा पुढाकार घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून कल्याण पाठोपाठ डोंबिवलीमध्येही ‘माणुसकीच्या भिंती’चा उपक्रम राबविण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे आणि उपअभियंता मिलिंद गायकवाड यांच्या प्रयत्नातून या उपक्रमाला प्रारंभ झाला आहे.
कल्याण पश्चिमेतील कमिश्नर बंगला परिसरात हेल्पिंग हॅन्ड संस्थेच्या सहाय्याने राणी लक्ष्मीबाई उद्यानात आणि डोंबिवली पूर्वेतील केडीएमसीच्या विभागीय कार्यालयामध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. माणुसकीच्या या भिंतीमध्ये रकान्यांची रचना करण्यात आली असून त्यामध्ये त्यांना नको असलेले सुस्थितीतील कपडे, निरुपयोगी असलेल्या पण गरजेच्या वस्तू, जुनी खेळणी ठेऊ शकणार आहेत. महापालिका परिसरातील कोणीही गरजू व्यक्ती या वस्तूंचा वापर करु शकणार आहे. तसेच या सर्व वस्तू किंवा कपडे गरीब / गरजू व्यक्तींना वितरित केल्या जातील. महापालिकेच्या इतर प्रभागक्षेत्रातही ‘माणूसकीची भिंत’ उभारण्याचा महापालिकेचा मानस असून नागरिकांनी आपल्या समाज बांधवांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन यावेळी रामदास कोकरे यांनी केले आहे.
कल्याणात झालेल्या या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला केडीएमसीच्या ‘ब’ प्रभागक्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते, आरोग्य निरिक्षक संजय धात्रक, हेल्पींग हॅण्ड या सामाजिक संस्थेचे सचिन राऊत आणि सहकारी तर डोंबिवलीमध्ये झालेल्या कार्यक्रमाला केडीएमसीचे उपायुक्त सुधाकर जगताप, शिवसेनेचे डोंबिवली शहराध्यक्ष तसेच माजी नगरसेवक राजेश मोरे, भाजपच्या प्रमिला चौधरी, श्रीकर चौधरी, केडीएमसी उपअभियंता मिलींद गायकवाड, ‘फ’ प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत, ‘ग’ प्रभागक्षेत्र अधिकारी स्नेहा कर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.