कल्याण-डोंबिवली दि.31 मार्च :
खासगी रुग्णालयात कोवीड रुग्णांना योग्य दरांमध्ये उपचार मिळण्यासह त्यांची लूट थांबवण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे पुन्हा एकदा कोवीड रुग्णालयांमध्ये ‘ऑडीटर्स’च्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. (KDMC re-appoints auditors in private Kovid hospitals in Kalyan Dombivali)
कोविड रूग्णास वाजवी दरात उपचार उपलब्ध व्हावेत, विनासायास बेड उपलब्ध होण्यासाठी खासगी कोवीड रूग्णालयांमध्ये महापालिकेमार्फत ऑडीटर्सच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. मात्र रुग्णसंख्या कमी झाल्याने फेब्रुवारी महिन्यात त्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांत महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांमध्ये झालेली वाढ पाहता महापालिकेने 26 खासगी कोविड रूग्णालयात ऑडीटर्सची नेमणूक केली आहे. कोविड रूग्णालयांमध्ये रूग्ण डिस्चार्ज करताना आकारलेल्या बिलांची शासन नियमांनुसार तपासणी करणे, जादा बिल आकारणी केल्याचे निदर्शनास आल्यास तसेच रूग्णालयाच्या निदर्शनास आणून देणे आणि रूग्णास योग्य बिले दिल्याबाबत खातरजमा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.