कल्याण – डोंबिवली दि.9 ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवलीत रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमूळे नागरिक हैराण झाले असतानाच आता केडीएमसीने खड्ड्यांची तक्रार नोंदवण्यासाठी ‘टोल फ्री’ नंबर सुरू केला आहे.
कल्याण डोंबिवलीमध्ये यंदा पावसाने रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. काही प्रमूख काँक्रीटचे रस्ते सोडले तर अंतर्गत भागातील रस्ते आणि दर्जाबाबत दरवर्षीप्रमाणे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परिणामी प्रसिद्धी माध्यमांसोबतच आता सामान्य नागरिकही सोशल मिडियाच्या माध्यमातून केडीएमसीवर टीकेची झोड उठवत आहेत.
तर पावसाची उघडीप मिळाल्यानंतर खड्डे भरण्याचे आणि दुरुस्तीचे काम सुरू केल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता खड्ड्यांच्या तक्रारीसाठी केडीएमसीने पुढाकार घेत 1800 233 0045 हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. नागरिकांनी या क्रमांकावर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत आपल्या तक्रारी नोंदवण्याचे आवाहन केडीएमसीतर्फे करण्यात आले आहे. तर नागरिकांनी आपल्या तक्रारी कार्यालयीन दिवशी आणि कार्यालयीन वेळेत नोंदवण्याचे आवाहन केडीएमसीच्या शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांनी केले आहे.