कल्याण-डोंबिवली दि.२५ मे :
अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम केडीएमसीने आणखी तीव्र करत एकाच वेळी ३ प्रभागातील बहुमजली इमारतींवर कारवाई सुरू केली आहे. पुढील ३ दिवस ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती केडीएमसी प्रशासनातर्फे देण्यात आली. (KDMC initiates action against unauthorized multi-storey buildings in 3 wards at the same time)
अनाधिकृत बांधकामांवर निष्कासनाची प्रभावी कारवाई करुन महापालिका परिसरातील सर्व सामान्य नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी , महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेच्या सर्व प्रभागातील सहा.आयुक्तांमार्फत काल सकाळपासूनच ई प्रभाग क्षेत्र, आय प्रभाग क्षेत्र आणि ह प्रभागक्षेत्रांतील बहुमजली अनाधिकृत इमारतींवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
ह प्रभागातील नवापाडा परिसरात G+7 अनाधिकृत इमारतीच्या बांधकामावर सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे, सुधीर मोकल, आय प्रभागात आडिवली ढोकळी परिसरात G+4 इमारतीवर सहाय्यक आयुक्त संजय साबळे, हेमा मुंबरकर, किशोर ठाकूर, सुहास गुप्ते यांच्या पथकाकडून आणि ई प्रभागात माणगाव डोंबिवली पूर्व येथील G+7 अनाधिकृत इमारतीवर सहाय्यक आयुक्त भारत पवार, सविता हिले, राजेश सावंत यांच्या पथकाकडून ही कारवाई सुरु झाली आहे.*
या अनाधिकृत इमारती निष्कासीत केल्यानंतर निष्कासनासाठी आलेल्या खर्चाची रक्कम संबंधित व्यक्तींच्या/विकासकांच्या मालमत्तेवर बोजा लावून वसूल करणेबाबतचे निर्देशही महापालिका आयुक्तांनी सहा.आयुक्तांना दिले आहेत. तसेच जमीन मालक/ विकासक/ भोगवाटा धारक यांच्या महापालिका क्षेत्रातील इतर मालमत्ता सोधून त्यांच्यावर देखील बोजा चढवण्याची कारवाई करणेबाबत तसेच यापूर्वी निष्कासीत केलेल्या परंतू अदयापपर्यंत निष्कासनाचा खर्च वसूल करण्यात आलेला नाही, अशा सर्व मिळकतींच्या निष्कासनाचा खर्च वसूल करण्यासाठी महसूल दप्तरी महापालिकेच्या नावे बोजा चढवण्याची कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिले आहेत.