कल्याण – डोंबिवली दि. 22 जुलै :
बुधवारी रात्रीपासून कल्याण डोंबिवलीला झोडपून काढलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अशा पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुमारे 200 हुन अधिक नागरिकांची कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून सुटका करत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
गेल्या 3 दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत तळ ठोकून असलेल्या पावसाने काल रात्री तर कहरच केला. परिणामी रात्रीच्या सुमारास बेसावध असणाऱ्या अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे हाल झाले. तर जसजशी सकाळ होऊ लागली तसे पाण्याचे प्रमाण वाढू लागल्याने नागरिकांच्या चिंतेमध्ये आणखीनच भर पडू लागली होती. मात्र अशावेळी केडीएमसी अग्निशमन दलाच्या जवानांनी पहाटेच्या सुमारास धाव घेत पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले.
कल्याण पश्चिमेतील सापर्डे, जगबुडी नगर येथून 15 लोकांना, भवानी नगर-अनुपम नगर-अंबिका नगर येथून 20, कल्याण पूर्वेतून 5 लोक, गोविंदवाडी परिसरातून तब्बल 110 तर डोंबिवली पश्चिमेतून 47 लोकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.
दरम्यान या सर्व लोकांनी महापालिका अग्निशमन दल आणि त्याच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.