आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्याकडून दुर्गाडी किल्ला परिसरातील डांबरीकरण कामाची पाहणी
कल्याण डोंबिवली दि.२६ ऑगस्ट :
कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची डागडुजीचे काम केडीएमसीकडून हाती घेण्यात आले आहे. या कामाची केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी आज पाहणी करत ठेकेदारांसह पालिका अधिकाऱ्यांचीही चांगलीच कानउघाडणी केली. शहरात सुरू असणारी खड्डे भरण्याची कामे व्यवस्थित आणि वेळेत पूर्ण करा अन्यथा ब्लॅकलिस्ट करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
तर तुम्हाला काळया यादीत टाकणार…
गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले असून पावसाने उघडीप दिल्याने केडीएमसी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर खड्डे भरण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेला दुर्गाडी किल्ला येथील रस्त्याचे डांबरीकरण काम सुरू असून केडीएमसी आयुक्त डॉ. दांगडे यांनी या कामांचा अचानक पाहणी दौरा केला. त्यावेळी खड्डे भरण्याचे काम व्यवस्थित आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तर अत्यंत कडक शब्दांमध्ये झापले. पण त्याचसोबत खड्डे भरण्याचे काम व्यवस्थित न केल्यास थेट काळया यादीत टाकण्याचा सज्जड दम त्यांनी ठेकेदारांना भरला आहे. केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या या रुद्रावतारा पुढे अधिकारी आणि ठेकेदारांची चांगलीच भंबेरी उडालेली पाहायला मिळाली.
रात्रं दिवस युद्ध पातळीवर भरणार खड्डे….
दरम्यान आज सकाळ पासून पावसाने उघडीप दिल्यामुळे केडीएमसी प्रशासनाने खड्डे भरण्यासाठी जोरदार कंबर कसलेली दिसत आहे. केवळ दिवसाच नव्हे तर रात्रीही आता रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम केले जाणार आहे. यासाठी महापालिकेने तेरा अभिकरणांना ही कामे दिली असून या एजन्सी 3 टिमच्या मार्फत हे काम करणार आहे. त्याचप्रमाणे येत्या 2 ते 3 दिवसांत श्री गणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम केले जाणार आहे. हे काम दर्जेदार होईल याची खबरदारी घेण्याच्या सुचना महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सर्व अभियंत्यांना दिल्या आहेत.
या पाहणी दौऱ्यात केडीएमसी आयुक्तांसह महापालिका सचिव संजय जाधव, बांधकाम विभाग कल्याणचे कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, उपअभियंता सोनावणे आदी अधिकारी उपस्थित होते.