कल्याण -डोंबिवली दि.27 मार्च :
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील दुकानांना लागू करण्यात आलेले निर्बंध उद्याच्या (रविवार 28 मार्च 2021) दिवशी मागे घेण्यात आले आहेत. कल्याण आणि डोंबिवलीमध्ये या निर्णयाविरोधात व्यापारी चांगलेच आक्रमक झालेले होते. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी व्यापाऱ्यांसह भेट घेत हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. त्यावर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी यासंदर्भात चर्चा करत होळीच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील दुकानदारांना दिलासा देण्यात आला. केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एलएनएनशी बोलताना ही माहिती दिली.
कल्याण डोंबिवलीमध्ये वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी प्रशासनाने दुकानांसाठी शनिवारी आणि रविवारी निर्बंध लागू केले होते. मात्र त्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे आज कल्याण डोंबिवलीमध्ये व्यापाऱ्यांनी उग्र आंदोलन करत या निर्णयाला जोरदार विरोध केला. आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याशी उड्डाणपूल उद्घाटन प्रसंगी चर्चा केली.
त्यामध्ये होळी सणाच्या पार्श्वभूमीवर उद्या म्हणजेच रविवारी 28 मार्च 2021 रोजी असणारे निर्बंध मागे घेण्यात आले. उद्याऐवजी आता हे सर्व निर्बंध जसेच्या तसे सोमवारी 29 मार्च 2021 रोजी लागू असणार असल्याचे केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एलएनएनशी बोलताना सांगितले. त्यामूळे उद्या अत्यावश्यकसह सर्व दुकाने, कार्यालये, हॉटेल-बार-रेस्टॉरंट नेहमीप्रमाणे दिलेल्या वेळेत सुरू राहणार आहेत. तर सोमवारी 29 मार्च रोजी रविवारचे सर्व निर्बंध लागू असणार आहेत. त्यामूळे सणासुदीच्या तोंडावर व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर पुढील आठवड्यातील शनिवार – रविवारच्या निर्बंधांबाबत पुढील आठवड्यातील कोवीड रुग्णसंख्या पाहून निर्णय घेणार असल्याचेही पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी एलएनएनशी बोलताना सांगितले.
*#LNN*
*#LocalNewsNetwork*