Home ठळक बातम्या केडीएमसी सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

केडीएमसी सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

 

14 फेब्रुवारीपर्यंत नोंदवता येणार हरकती

कल्याण डोंबिवली दि.1 फेब्रुवारी :
गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना आणि नकाशे आज जाहीर करण्यात आले. केडीएमसी मुख्यालयात या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्याने त्या पाहण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे विद्यमान नगरसेवकांसह अनेक इच्छुकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आज जाहीर झालेल्या वॉर्ड रचनेसाठी 2011च्या जनगणनेचा आधार घेण्यात आला असला तरी आतापर्यंत झालेली लोकसंख्येतील नैसर्गिक वाढही त्यात गृहीत धरण्यात आली आहे. केडीएमसी प्रशासनाने आज जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेत एकूण 133 प्रभाग असून 44 पॅनलमध्ये ते विभागण्यात आले आहेत. तर 44 पैकी पहिले 43 पॅनलमध्ये 3 उमेदवार तर शेवटच्या म्हणजेच 44 व्या पॅनेलमध्ये 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे असतील. तर आज जाहीर झालेल्या या प्रारूप वॉर्ड रचनेबाबत हरकती नोंदवण्यासाठी 14 फेब्रुवारीपर्यंतचा 2 आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. यासाठी केडीएमसी मुख्यालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. याठिकाणी प्राप्त होणाऱ्या हरकतींवर निवडणूक आयोग सुनावणी 26 फेब्रुवारीपर्यंत होणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

एकूण 133 सदस्य या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून येणार आहेत. त्यापैकी 67 जागा महिलांसाठी असतील. तर एकूण सदस्य संख्येपैकी अनुसूचित जातींसाठी 13 जागा राखीव असून त्यापैकी अनुसूचित जातींच्या महिलासाठी 7 जागा राखीव आहेत. अनुसूचित जमातीसाठी 4 जागा असून त्यापैकी 02 जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण (खुल्या) जागा 116 असून त्यापैकी 58 जागा महिलांसाठी राहणार आहेत.

तर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 ची प्रारुप प्रभाग रचना www.kadmcelection.com या वेबसाइटवर उपलब्ध असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

 

सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील प्रभाग रचना – मनसे आमदार राजू पाटील…

तर आज जाहीर झालेल्या या प्रारूप प्रभाग रचनेवर मनसे आमदार राजू पाटील यांनी जोरदार आक्षेप घेत सत्ताधाऱ्यांना फायदा होईल अशीच प्रभाग रचना करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. मात्र मनसेला त्याचा काहीही फरक पडणार नसून मनसे संपूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढवणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

2020 च्या ऑक्टोबर महिन्यात केडीएमसीची निवडणूक होणार होती. मात्र कोवीडच्या संकटामूळे निर्माण झालेल्या भयानक परिस्थितीत शासन-प्रशासन निवडणूका घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. परंतू गेल्या महिन्यात आलेली कोवीडची तिसरी लाट सध्या झपाट्याने ओसरू लागली आहे. त्यामूळे प्रशासकीय यंत्रणेनेही आता हळूहळू निवडणूक प्रक्रिया सुरू केल्याचे दिसत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा