कल्याण दि.14 डिसेंबर :
कल्याण डोंबिवलीच्या महापालिका आयुक्त म्हणून दाखल झालेल्या डॉ. इंदुराणी जाखड यांनी कर वसुलीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. भूखंडावरील जमीन मिळकतीचा लाखोंचा कर थकवल्याप्रकरणी केडीएमसीच्या करवसुली विभागाने विकासकाचे पाच फ्लॅट सील केले आहेत.
कल्याण पश्चिमेतील महापालिकेच्या ब प्रभाग कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या बारावे परिसरातील या जमिन मिळकतीचा तब्बल ४४ लाख १८ हजार २३२ रुपये कर महापालिकेला येणे बाकी आहे. हा कर वसूल करण्याच्या उद्देशाने केडीएमसी आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार संबंधित इमारतीच्या इ विंगमधील विकासकाच्या पाच फ्लॅटना जप्तीची नोटीस बजावत सील ठोकण्यात आले.
दरम्यान करदात्यांनी मालमत्ता कर वेळेत भरावा आणि जप्तीची कटू कारवाई टाळण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी केले आहे.