केडीएमसीच्या बाजार – परवाना विभागाने अनेकांना बजावल्या नोटीसा
कल्याण डोंबिवली दि.27 सप्टेंबर :
कल्याण डोंबिवलीतील हॉटेल्स, रेस्तरॉ, बेकरीं, ढाब्यावर तंदूर पदार्थांसाठी कोळसा आणि लाकूड वापरणाऱ्यांविरोधत केडीएमसी चांगलीच आक्रमक झाली आहे. हे तंदूर पदार्थ बनविण्यासाठी लाकूड आणि कोळशाऐवजी एलपीजी – इलेक्ट्रीसिटीचा वापर केला नाही तर थेट सिल ठोकण्याचा इशारा केडीएमसी प्रशासनाकडून देण्यात आला आहे. कल्याण डोंबिवलीतील अशा अनेक व्यावसायिक आस्थापनांना केडीएमसीच्या बाजार आणि परवाना विभागाकडून नोटीसा बजावण्यात आल्या असून त्याद्वारे हा इशारा देण्यात आला आहे. (KDMC aggressive against hotels, restaurants, bakeries that use coal – wood)
पर्यावरण संवर्धनासह वायु प्रदूषण टाळण्याकरीता केडीएमसी क्षेत्रातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे , बेकरीज, तंदुर हॉटेल्स, ओपन रेस्टॉरंट यांनी दैनंदिन वापरामध्ये व्यावसायिक इंधनाऐवजी (लाकुड, कोळसा) जैविक इंधन (एलपीजी, इलेक्ट्रीसिटी) चा वापर करण्याचे निर्देश एमपीसीबीकडून केडीएमसी प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार ज्या आस्थापना अद्यापही दैनंदिन वापरामध्ये जैविक इंधनाऐवजी व्यावसायिक इंधन वापरत आहेत, अशा आस्थापनांना केडीएमसी बाजार आणि परवाना विभागामार्फत नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. महानगरपालिका परीक्षेत्रातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबे, बेकरीज, तंदुर हॉटेल्स, ओपन रेस्टॉरंट हे त्यांच्या दैनंदिन व्यवसायात लाकुड आणि कोळशाचा वापर करणाऱ्या आस्थापनांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. ज्यामध्ये कल्याण परीक्षेत्रात निलकमल, गरीब नवाज, मदिना, हुसैन आणि सागर बेकरी हे लाकुड कोळशाचा वापर करीत आहेत. तर विहार – फाईनडाईन हॉटेल तर डोंबिवली परीक्षेत्रातील श्रीकृष्ण बेकरी, रूबीना बेकरी यांनाही नोटिसा बजाविण्यात आल्याची माहिती केडीएमसी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ज्या आस्थापना व्यवसायिक इंधन वापरत आहेत, अशा आस्थापनांनी तातडीने त्यांच्या दैनंदिन व्यवसायात जैविक इंधनाचा वापर आगामी 15 ते 20 दिवसात सुरु करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांच्याकडून करण्यात आले आहे.
तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर महापालिकेच्या बाजार – परवाना विभागामार्फत सिल करण्याची कारवाई करण्याचा इशारा बाजार – परवाना विभागाचे सहा. आयुक्त प्रसाद ठाकुर यांनी दिला आहे.