अनधिकृत बांधकामांसोबत नळ आणि वीज जोडणीही होणार खंडीत
कल्याण दि.5 फेब्रुवारी :
अनधिकृत बांधकामांच्या विषयांवर सध्या केडीएमसीतील वातावरण ढवळून निघाले असून केडीएमसी प्रशासनाकडून वेगवेगळ्या भागात कारवाई केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून केडीएमसी अ प्रभाग क्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या टिटवाळ्याच्या बल्याणी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर केडीएमसीकडून कारवाई सुरू झाली आहे. (KDMC action on unauthorized constructions in Titwala’s Balyani area)
टिटवाळा परिसरात मोठ्या प्रमाणावर मोकळे भूखंड असून त्यावर बिनदिक्कतपणे शेकडोंनी अनधिकृत बांधकामे केल्याच्या तक्रारी केडीएमसीला प्राप्त झाल्या आहेत. केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली टिटवाळा बल्याणी परिसरातील या अनधिकृत चाळींवर आजपासून केडीएमसीने कारवाई सुरू केली आहे.
अनधिकृत बांधकामांवरील ही कारवाई पुढील तीन दिवस चालणार असून त्यामध्ये याठिकाणी असणारी नळ जोडणी आणि वीज जोडणीही खंडीत करण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिली आहे.