डोंबिवली दि.25 जुलै :
नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमीपुत्रांनी काढलेल्या लाखोंच्या मोर्चामुळेच खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रीपद दिले असावे असे मत पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. कल्याण डोंबिवलीतील निर्भय जर्नलिस्ट असोसिएशन (रजि) पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.
खासदार कपिल पाटील हे केंद्रीय राज्यमंत्री झाले त्याबद्दल अभिनंदन करत गायकवाड म्हणाले की नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमीपुत्रांनी नवी मुंबईत अभूतपूर्व असे आंदोलन केले. ज्यामध्ये 3 ते 4 लाख लोकं सहभागी झाले होते. ही ताकद पाहूनच मग खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिपद दिले असावे असे गायकवाड म्हणाले.
लोकनेते दि.बा. पाटील हा विषय केवळ रायगडपुरता मर्यादित नाहीये. त्यांच्याकडे केवळ आगरी नेता म्हणून बघणे चुकीचे ठरेल. त्यांनी केलेलं जे काम आहे ते पाहता दि.बा. पाटील यांच्यासारखा नेता पुनः होणे नाही. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला त्यांच्या नावाशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसल्याचे सांगत तसे न झाल्यास विमानतळाचे काम आम्ही बंद पाडू या इशाऱ्याच्या त्यांनी पुनरुच्चार केला.
यावेळी जगदीश गायकवाड यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवरही जोरदार हल्ला चढवला. आताची शिवसेना ब्रिटिशांची आहे असून बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. बाळासाहेब असताना शिवसैनिकावर अन्याय होत नव्हता. परंतु आता शिवसैनिकच शिवसैनिकावर अन्याय करतोय. ठाण्यात पॅकेज सिस्टम सुरू झाली असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती सुरू केल्याचा गंभीर आरोपही गायकवाड यांनी यावेळी केला.
तर टोरोंट कंपनीच्या विषयाबाबत बोलताना ते म्हणाले की पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे ही कंपनी भूमीपुत्रांवर लादली गेली आहे. मात्र भूमीपुत्रांनी ठरवले पाहिजे की आम्ही यापुढे शिवसेना आणि राष्ट्रवादीला मतदान करणार नाही. तरच टोरंट कंपनी इकडून काढता पाय घेईल असे गायकवाड म्हणाले.
यावेळी जगदीश गायकवाड यांनी आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीवरही आपण लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगत येणाऱ्या निवडणुकीत आरपीआयचे किमान 5 तरी नगरसेवक निवडून आणण्याचे आपले प्रयत्न असतील असेही गायकवाड यावेळी म्हणाले.