सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामाचा वाहतुकीवर परिणाम
कल्याण दि.2 एप्रिल :
कल्याणचा सुप्रसिद्ध पत्रीपुल काही वर्षांनंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आणि गेल्या वेळेप्रमाणे हा पूल चर्चेत येण्याचे निमित्त तसेच कारण हे एकच आहे, वाहतूक कोंडी. गेल्या काही दिवसांपासून पत्रीपुल परिसरात पुन्हा एकदा प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागल्याने वाहन चालक आणि नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
पत्रीपुलाच्या पलिकडे म्हणजेच गोविंदवाडी / दुर्गाडी बायपासच्या दिशेला सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचे काम केले जात आहे. त्यासाठी नेतीवलीकडे येणारी रस्त्याची एक बाजू पूर्णपणे खोदण्यात आली असून त्याठिकाणी सिमेंट काँक्रिट रस्ता बनवला जात आहे. याचा परिणाम साहजिकच या मार्गावरून दररोज जाणाऱ्या हजारो वाहन चालकांना बसत असून प्रचंड वाहतूक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. आधीच गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या झळांनी लोकांना नकोसे केले असताना त्यात आता या वाहतूक कोंडीच्या त्रासामुळे लोकांची आगीतून फुफाट्यात अशी काहीशी विचित्र परिस्थिती झाली आहे. या रस्त्याच्या कामामुळे वाहतूक पोलीसांकडून एका वेळी एकाच बाजूची वाहतूक सोडण्यात येत असल्याने सकाळ संध्याकाळ प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. पत्रीपुल ओलांडण्याच्या अवघ्या पाच मिनिटांच्या जागी तास तासभर लोकं खोळंबून राहत आहेत. त्यात परीक्षांचा काळ सुरू असून विद्यार्थ्यांच्या बसेससोबतच अनेक रुग्णवाहिकाही या कोंडीत अडकून पडत असल्याची माहिती स्थानिक नागरिक शकील खान यांनी दिली. त्यामुळे या समस्येवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी वाहन चालक आणि नागरिकांकडून केली जात आहे.
पुन्हा जागवल्या जात आहेत जुन्या स्मृती…
याठिकाणी रेल्वे मार्गावर असणारा जुना पत्रीपुल धोकादायक झाल्याने ऑगस्ट 2018 मध्ये त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आणि नोव्हेंबर 2018 मध्ये जुना पुल जमीनदोस्त करण्यात आला होता. त्यावेळी कल्याण डोंबिवलीकरांनी न भूतो न भविष्यती अशा प्रचंड वाहतूक कोंडी आणि त्रासाचा सामना केला होता. मात्र त्यावेळी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या रेल्वेकडील पाठपुराव्यामुळे याठिकाणी जानेवारी 2021 मध्ये नविन पुल उभारण्यात आला आणि लोकांची वाहतूक कोंडीच्या जाचातून सुटका झाली होती. सध्या होणाऱ्या या वाहतूक कोंडीने या जुन्या कटू आठवणी ताज्या झाल्याची भावना काही नागरिकांनी व्यक्त केली आहे.