कल्याण दि.29 ऑक्टोबर :
“सद्रक्षणाय – खलनिग्रहणाय” म्हणजेच चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि दुष्टांचा नाश करणे असे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. मात्र कल्याणातील महात्मा फुले चौक पोलिसांनी चांगल्या लोकांचे रक्षण करण्यासोबतच त्याहीपुढे जात आता एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याचा सामाजिक विडा उचलला आहे. आपापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महात्मा फुले पोलिसांकडून सामाजिक बांधिलकी जपत राबवलेल्या या अनोख्या उपक्रमाचे कल्याणात कौतुक होत आहे. (Kalyans MFC police social initiative On the occasion of Diwali elderly people living alone are taken care of)
सध्याच्या काळात विभक्त कुटुंब पद्धती आणि वाढत्या धकाधकीमुळे अनेक घरांमध्ये ज्येष्ठ व्यक्ती एकट्यानेच आपले जीवन व्यतीत करत आहेत. तर बऱ्याच जणांची मुले नोकरीनिमित्ताने परदेशी स्थायिक झाली असून लग्न होऊन मुलीही सासरी गेल्याने अशा आजी-आजोबांची जबाबदारी कोण घेणार, हा एक मोठा सामाजिक प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अशा ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याचे आदेश स्थानिक पोलीस ठाण्यांना दिले आहेत.
याअंतर्गत कल्याणातील महात्मा फुले चौक पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील माऊली ज्येष्ठ नागरिक मंडळ, सावली ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या एकटे राहणाऱ्या तसेच पती-पत्नीसह राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांशी दिवाळीनिमित्त संवाद साधला. आणि या ज्येष्ठ नागरिकांना महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या वतीने दिवाळी फराळ, मिठाई, पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यादरम्यान जेष्ठ नागरिकांशी खेळीमेळीचे वातावरणात त्यांच्या अडी-अडचणी, समस्या जाणून घेत त्यांना तत्पर मदत देण्याची ग्वाही पोलीसांनी दिली. तसेच रात्री अपरात्री एखादी मदत लागल्यास 1090 हा ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन नंबरही देण्यात आला. ज्येष्ठांना अचानक मदत लागली तर, ती देण्यासाठी पोलिस मदत करतात. ते सुरक्षित आहेत किंवा नाही, त्यांना काही भीती आहे का? याचीही आस्थेने विचारपूस करत ज्येष्ठांच्या घरात कामासाठी कोण येतात, त्यांची वर्तणूक कशी आहे, याबाबतचीही माहितीही या कार्यक्रमाद्वारे घेण्यात आली. या कार्यक्रमाला परिसरातील ६० ते ७० ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
यावेळी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक हुंबे, उपनिरीक्षक चौधरी, उपनिरीक्षक पवार, गोपनीय कक्षाचे पोलीस हवालदार जगदीश महाजन, साहेबराव माळी आदी पोलीस अधिकारी वर्ग उपस्थित होता.