केडीएमसी क्षेत्रात मुंबई मॅरेथॉनसारखी मोठी स्पर्धा भरवणार – केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा मानस
कल्याण दि.१३ नोव्हेंबर :
मुंबईनंतर आणि मुंबईबाहेरील सर्वात मोठी अर्ध मॅरेथॉन ठरलेल्या कल्याणातील आयमेथॉनला स्पर्धकांनी तुफान प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण रनर्स ग्रुपच्या माध्यमातून आयोजित या स्पर्धेमध्ये देशाच्या विविध राज्यांसह आणि केनिया – नायजेरियासारख्या आफ्रिकन देशांतील धावपटूही सहभागी झाले होते. त्याला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यापेक्षा मोठी मॅरेथॉन कल्याण डोंबिवलीत आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.
स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळेला आर्थिक मदत…
या स्पर्धेच्या माध्यमातून मुरबाडमधील ग्रामीण भागातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, केडीएमसी सचिव संजय जाधव, उपआयुक्त अतूल पाटील, माजी नगरसेवक वरुण पाटील, केडीएमसी अभियंता प्रशांत भागवत, आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आर्थिक मदत करण्यात आली.
शहराच्या विकासासाठीही सर्वांनी एकजूट दाखवा…
तर ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्याप्रमाणे सर्व जण एकत्र आलो अगदी तसेच आपल्या कल्याण शहराच्या विकासासाठीही सर्वांनी एकजूट दाखवण्याचे आवाहन आयोजक डॉ. प्रशांत पाटील यांनी यावेळी केले.
तब्बल साडेतीन हजार धावपटू सहभागी…
आज झालेल्या या अर्ध मॅरेथॉनमध्ये मुंबई, कल्याण डोंबिवलीसह हरियाणा, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्यप्रदेश, चंदीगड आदी राज्यांतील तब्बल साडेतीन हजार धावपटू सहभागी झाले होते. केनिया आणि नायजेरियाहून आलेले दोघं आंतरराष्ट्रीय धावपटू या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले.
मुंबईबाहेरील ही सर्वात मोठी अर्ध मॅरेथॉन…
कल्याण पश्चिमेच्या दुर्गाडी चौकातून सुर झालेली ही अर्ध मॅरेथॉन ३ किमी, ५ किमी, १० किमी आणि २१ किमी (हाफ मॅरेथॉन) अशा चार विभागांत (महिला – पुरुष) खेळवण्यात आली. तर या स्पर्धेचा आवाका लक्षात घेता मुंबईनंतर मुंबईबाहेरील ही सर्वात मोठी अर्ध मॅरेथॉन ठरली.
ही अर्ध मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी कल्याण आयएमएच्या डॉ. आश्विन कक्कर, डॉ. गणेश शिरसाठ, डॉ. सुरेखा इटकर, डॉ. विकास सुरंजे यांच्यासह कल्याण रनर्स ग्रुपचे समीर पाटील आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.