Home ठळक बातम्या “कल्याणकारी कल्याणकर” : गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एकवटले “सर्वधर्मीय कल्याणकर”

“कल्याणकारी कल्याणकर” : गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एकवटले “सर्वधर्मीय कल्याणकर”

कल्याण दि.20 जुलै :
एकीकडे समाजातील दुही वाढत चालली असतानाच गरजू विद्यार्थ्यांच्या शालेय मदतीसाठी सर्वधर्मीय कल्याणकर नागरिक एकत्र आले. कल्याणकारी कल्याणकर या सामाजिक चळवळीच्या पुढाकाराने आणि शिवसेनेच्या पारनाका विभागीय शाखेतर्फे हा अनोखा सामाजिक सोहळा संपन्न झाला.

समाजाच्या वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असलेल्या पारनाका येथील अभिनव विद्यामंदिर शाळेतील 9 वी आणि 10 वीच्या अनेक गरजू विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांची आवश्यकता होती. मात्र त्यासाठी येणारा आर्थिक खर्च परवडणारा नसल्याने शाळेकडून यासाठी आवाहन करण्यात आले होते. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख दिनेश शेटे यांनी ही बाब महाराष्ट्र रेडिओलॉजीस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांना सांगितली.

त्यावर डॉ. पाटील यांनी कल्याणकारी कल्याणकर या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून मित्र परिवाराला आर्थिक मदतीची साद घातली. आणि पाहता पाहता अवघ्या काही दिवसांतच आवश्यक ती आर्थिक मदत जमा झाली. याचे वैशिष्ट्य म्हणजे समाजातील प्रत्येक जाती – धर्माचे नागरिक आपापली जात – धर्म विसरून मानवतेच्या दृष्टिकोनातून या विद्यार्थ्यांसाठी एकवटल्याचे दिसून आले. तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या गुढीपाडव्याच्या नववर्ष स्वागत यात्रेच्या माध्यमातून डॉ. प्रशांत पाटील यांनी सर्व कल्याणकरांना एकत्र आणण्यात यश मिळवले होते. त्याच धर्तीवर आता अभिनव विद्यामंदिर शाळेच्या या गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठीही सर्वच जण आपापले जाती धर्म विसरून एकत्र आले.

दरम्यान या सर्व कल्याणकारी कल्याणकरांच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून अभिनव विद्यामंदिर शाळेच्या 9-10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पुस्तकांची खरेदी करण्यात आली. आणि आज शाळेच्या डॉ. आनंदीबाई जोशी सभागृहात झालेल्या शानदार सोहळ्यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख सचिन बासरे, महाराष्ट्र रेडिओलॉजीस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील, उपशहर प्रमूख दिनेश शेटे, वंडार कारभारी, महिला संघटक सुजाता तारगळकर, शाखाप्रमुख पंकज माने यांच्यासह गिरीश दायमा, प्रज्ञा पटेल, राजेश नार्वेकर, राजश्री शर्मा या दानशूर व्यक्तींसह शाळेचे मुख्याध्यापक संपत गीते सर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा