Home ठळक बातम्या ग्रीन स्माईल उपक्रमामध्ये कल्याणकरांनी घडवला इतिहास

ग्रीन स्माईल उपक्रमामध्ये कल्याणकरांनी घडवला इतिहास

गुढीपाडवा स्वागतयात्रेचे समन्वयक डॉ. प्रशांत पाटील यांच्या संकल्पनेतून झाला सोहळा

कल्याण दि. 21 ऑगस्ट :
कल्याणच्या टिटवाळा – आंबिवली रिंगरोडवर राबवण्यात आलेल्या ग्रीन स्माईल उपक्रमाच्या माध्यमातून कल्याणकरांनी नविन इतिहास घडवला. इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याण, कल्याण संस्कृती मंच, केडीएमसी आणि आयुष हॉस्पिटलच्या माध्यमातून झालेल्या वृक्ष लागवडीसाठी पहिल्यांदाच शहरातील सामाजिक संस्था, प्रतिष्ठित नागरिक आणि सामान्य नागरिक एकत्र आले. आगामी रौप्य महोत्सवी गुढीपाडवा स्वागतयात्रेचे समन्वयक डॉ. प्रशांत पाटील यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.

प्रशासन – नागरिक एकत्र आल्यास निश्चितपणे परिस्थिती बदलेल – डॉ. भाऊसाहेब दांगडे

कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांची फक्त दोष देण्याची प्रवृत्ती नसून शासनाबरोबर काम करण्याची मानसिकता ही दिसून येते. प्रशासन आणि नागरिक एकत्र आल्यास निश्चितपणे परिस्थिती बदलू शकते असे कौतुकोद्गार आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी या वृक्षारोपण प्रसंगी काढले. तसेच कल्याण डोंबिवलीकरांना चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी केडीएमसी प्रशासन कटिबद्ध असून इथली वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या रिंगरोडचे काम लवकरच पूर्णत्वास जाईल असा विश्वासही डॉ. दांगडे यांनी यावेळी व्यक्त केला.

शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग…
रिंगरोडच्या टिटवाळा आंबिवली भागात आज सकाळी ग्रीन स्माईल उपक्रम राबवण्यात आला. या रिंगरोडवर तब्बल 2 किलोमीटरपर्यंत दोन्ही भागांत वेगवेगळ्या देशी प्रजातीच्या झाडांची रोपे लावण्यात आली. केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, डीसीपी सचिन गुंजाळ यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक संस्था आणि 5 वर्षांच्या चिमुरडीपासून ते 90 वर्षांच्या आजीबाईंपर्यंत शेकडो नागरिक सहभागी झाले होते. तर काही मुंबई ठाण्यात स्थायिक झालेले माजी कल्याणकर नागरिकही यावेळी उपस्थित होते.

झाडांच्या देखभालीसाठी विशेष संस्था नियुक्त…
विशेष म्हणजे कल्याणकरांनी ही सर्व झाडे स्वखर्चातून लावली असून ती जगविण्यासाठीही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. प्रत्येक झाडाची देखभाल करण्यासाठी आयएमए कल्याणने विशेष संस्था नियुक्त केली आहे. तर आज ज्या व्यक्तींनी झाडे लावली त्यांच्या नावाचे बोर्ड त्या झाडांवर लावण्यात आले आहेत.

मान्यवरांच्या हस्ते या पाच प्रमूख वृक्षांची लागवड…
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एकता मानव वृक्ष, डॉ. आनंदी गोपाळ यांच्या नावाचा, कोविडशी लढताना मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची आठवण म्हणून आणि देश रक्षणासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांप्रति कृतज्ञता म्हणून एक अशा पाच मानाच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी केडीएमसी घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, कल्याण संस्कृती मंच अध्यक्ष डॉ.सुश्रुत वैद्य, सचिव श्रीराम देशपांडे, खजिनदार अतुल फडके, हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयएमए कल्याण अध्यक्षा डॉ. ईशा पानसरे, उपाध्यक्षा डॉ.सुरेखा इटकर, सचिव विकास सुरंजे, डॉ अश्विन कक्कर, डॉ. राजेश राजू, डॉ. शुभांगी चिटणीस, डॉ. नितीन चिटणीस, डॉ. भाग्यश्री मोघे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

दरम्यान येत्या 17 डिसेंबर रोजी होणाऱ्या आयमेथॉन – 4 स्पर्धेच्या प्रोमो टी शर्टचे अनावरणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा