कल्याण दि.13 नोव्हेंबर :
सध्याचे राजकीय वातावरण पाहिले तर राजकीय विरोधक नव्हे तर जणू काही हाडवैरीच आहेत की काय? असा भास होत असताना कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ मात्र याला अपवाद ठरला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही कल्याण पश्चिमेतील महायुती आणि मनसेच्या उमेदवारांनी मात्र कल्याणची राजकीय परंपरा जपल्याचे दिसून आले. (Kalyan West: Maha Uti-MNS candidates uphold Kalyan’s tradition of “political profundity”)
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून मतदानाला अवघा एक आठवडा उरला आहे. त्यामुळे प्रमूख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचार रॅली, उमेदवारांच्या गाठी भेटीवर भर दिला आहे. मात्र आपापल्या राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका असल्या तरी आपण एकमेकांचे शत्रू नाही तर केवळ राजकीय विरोधक ही राजकीय प्रगल्भता पुन्हा एकदा कल्याणात दिसून आली.
त्याचे झाले असे की कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर आणि मनसेचे उमेदवार उल्हास भोईर यांची प्रचार रॅली एकमेकांसमोर उभी ठाकली. त्यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांकडून आपापल्या उमेदवारासाठी जोरदार घोषणाबाजीही केली गेली. आणि त्यानंतर जे झाले ते पाहून दोन्ही बाजूंचे कार्यकर्तेही अवाक झाले.
कल्याण पश्चिमेतील ठाणकर पाडा परिसरात विश्वनाथ भोईर आणि उल्हास भोईर यांची प्रचार रॅली आली. आणि मनसे उमेदवार उल्हास भोईर हे थेट महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्याजवळ गेले आणि दोघांनी गळाभेट घेत हाताने विजयी मुद्रा केली.
एकीकडे दररोज एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक करणारे राजकारणी हळूहळू मुद्द्यांवरून गुद्द्यावर आले आहेत. मात्र कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर आणि मनसेचे उमेदवार उल्हास भोईर यांनी कल्याणातील राजकीय प्रगल्भतेची परंपरा आजही कायम ठेवली आहे. आणि राजकीय विरोधक म्हणजे आपले पक्के शत्रू किंवा हाडवैरीच हे सध्याचे चित्र पुसून काढत आदर्श निर्माण केला आहे.