Home ठळक बातम्या कल्याण पश्चिम विधानसभा : वरुण पाटील यांच्याकडून महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना...

कल्याण पश्चिम विधानसभा : वरुण पाटील यांच्याकडून महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना जाहीर समर्थन

विश्वनाथ भोईर यांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा वरुण पाटील यांचा निर्वाळा

कल्याण दि.11 नोव्हेंबर :
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात आणखी एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. कल्याण पश्चिमेतील शिवसेना भाजप राष्ट्रवादी रिपाइं महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्याविरोधातील भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांचे बंड अखेर शमले आहे. महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या निवडणूक मध्यवर्ती कार्यालयामध्ये भाजपचे माजी मंत्री कपिल पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन वरुण पाटील यापुढे महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिक काम करतील अशी ग्वाही दिली. (Kalyan West Legislative Assembly: Varun Patil has publicly supported Vishwanath Bhoir, the candidate of the Grand Alliance)

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र त्यानंतरही भाजपचे शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने खळबळ उडाली होती. परंतू भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वरुण पाटील यांनी भेट घेतली. त्यावेळी कल्याण पश्चिमेची जागा शिवसेनेकडे गेली असून वरुण पाटील यांनी युतीधर्म पाळणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच वरुण पाटील हे संघटनेचे अध्यक्ष असून त्यांनी युतीधर्माचे पालन करावे अशा सूचना फडणवीस यांनी वरुण पाटील यांना दिल्या. तसेच फडणवीस यांच्या भेटीनंतर वरुण पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेत चर्चा झाल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले. या दोन्ही नेत्यांच्या शब्दांना मान देऊन वरुण पाटील यांनी वेळेमध्ये आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नसला तरी महायुती उमेदवारासोबत राहण्याची भूमिका घेतल्याचे कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.

तर भाजप पक्षश्रेष्ठींकडून वरुण पाटील यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई स्थगित करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचेही कपिल पाटील यावेळी म्हणाले.

यावेळी महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शिवसेना शहराध्यक्ष रवी पाटील, वरुण पाटील, प्रेमनाथ म्हात्रे, शिवसेनेच्या महिला संघटक छायाताई वाघमारे, माजी नगरसेवक श्रेयस समेळ, यांच्यासह शिवसेना भाजप शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा