कल्याण दि.29 ऑक्टोबर :
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि रिपाई महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार विश्वनाथ भोईर यांनी आज शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कल्याण पश्चिमेतील खडकपाडा ते मुंबई विद्यापीठ चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. (Kalyan West Legislative Assembly: In the presence of hundreds of supporters, the candidate of the Mahayuti, Vishwanath Bhoir, filed his candidature)
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून परवा रात्री जाहीर झालेल्या उमेदवारी यादीमध्ये कल्याण पश्चिमेतून विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस असून विश्वनाथ भोईर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत आपला अर्ज दाखल केला आहे. एकीकडे ढोल ताशांचा गजर साथीला ब्रास बँड आणि कोण आला रे कोण आला, विश्वनाथ भोईर आगे बढो, शिवसेना झिंदाबाद आदी घोषणांच्या निनादामध्ये विश्वनाथ भोईर यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ज्यामध्ये अनेक माजी नगरसेवक, विद्यमान पदाधिकारी, शेकडो कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सामील झाले होते.
महायुती अभेद्य,बंडखोरी होणार नाही – उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला विश्वास
दरम्यान महायुतीत कोणत्याही प्रकारे बंडखोरी होणार नाही, आम्ही एकत्र लढणार ,महायुती अभेद्य असल्याचे विश्वनाथ भोईर यांनी यावेळी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. तसेच पक्षांतर्गत त्यांचे काही वाद असतील त्यामुळे असे निर्णय घेतले असावे. मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत हे सर्व वाद मिटलेले असतील. आम्ही एक अभेद्य महायुती म्हणून ही निवडणूक लढणार आणि जिंकणार असा ठाम विश्वासही विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी विश्वनाथ भोईर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, भाजपचे माजी नगरसेवक अर्जुन भोईर, रिपाईचे ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे, शिवसेना उपनेत्या विजया पोटे, शहरप्रमुख रवी पाटील, माजी नगरसेवक संजय पाटील, मयूर पाटील, गणेश जाधव, सुनिल वायले, जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर, माजी नगरसेवक वैशाली विश्वनाथ भोईर, विद्याधर भोईर, मोहन उगले, छाया वाघमारे, श्रेयस समेळ, शालिनी वायले, रजनी भारत मिरकुटे, नेत्रा उगले, माजी परिवहन समिती सदस्य सुनिल खारुक, विभागप्रमुख रामदास कारभारी, युवासेनेचे सूचेत डामरे, प्रतिक पेणकर यांच्यासह कल्याण, मोहने, टिटवाळा भागातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.