महायुती, महाविकास आघाडी आणि मनसेमध्ये तिरंगी लढत
कल्याण दि.4 नोव्हेंबर :
अखेर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे राजकीय चित्र स्पष्ट झाले असून याठिकाणी महायुती, महाविकास आघाडी आणि मनसेमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या अखेरच्या दिवशी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपला अर्ज मागे घेतलापरंतु विद्यमान शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी मात्र उमेदवारी अर्ज कायम ठेवत अपक्ष निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये आता बंडखोर उमेदवार वरुण पाटील यांच्यासह महायुती, महाविकास आघाडी आणि मनसेमध्ये लढत होणार आहे. (Kalyan West: Former MLA Narendra Pawar withdraws while Varun Patil remains in the election fray)
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज दुपारी 3 वाजेपर्यंतचा वेळ होता. त्यामुळे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि विद्यमान शहराध्यक्ष वरुण पाटील हे दोघेही काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले होते. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र त्याविरोधात भाजपचे कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि विद्यमान शहराध्यक्ष वरुण पाटील यांनी दंड थोपटत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. हे अर्ज मागे घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पक्षश्रेष्ठींकडून पवार आणि पाटील या दोघांच्याही मनधरणीचे प्रयत्न सुरू होते. या मनधरणीला काही प्रमाणातच यश आले आणि नरेंद्र पवार यांनी आपला अर्ज मागे घेतला तर वरुण पाटील यांनी मात्र निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणे पसंत केले आहे.
परिणामी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे विश्वनाथ भोईर, महाविकास आघाडीचे सचिन बासरे आणि मनसेचे उल्हास भोईर यांच्यासह भाजपचे बंडखोर उमेदवार वरुण पाटील यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे.