विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग
कल्याण दि.२६ नोव्हेंबर :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कल्याणात एक अनोखा उपक्रम राबविल्याचे दिसून आले. बाईकपोर्ट सायकल ग्रुपच्या माध्यमातून कल्याण ते दिल्ली अशा सायकल प्रवासाला आजपासून प्रारंभ झाला. या उपक्रमातून आतापर्यंत तब्बल साडे सात लाखांचा मदतनिधी जमा झाला आहे.
ठाणे जिल्ह्याचा शहरी भाग वगळता इथल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सुप्त गुण आहेत. मात्र शिक्षणाच्या मर्यादित संधींमूळे इच्छा असूनही शिक्षणात ही मुलं पुढे येऊ शकत नाही. नेमका हाच धागा पकडून बाईकपोर्ट सायकल ग्रुपने यंदा ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती निधी जमा करण्याचा निर्णय घेतला. आणि बघता बघता या सामाजिक उपक्रमाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत या शिष्यवृत्तीसाठी साडे सात लाखांचा निधी जमा झाला असून येत्या काही दिवसांत त्यात अजून वाढ होण्याचा विश्वास या ग्रुपने व्यक्त केला आहे. ग्रामीण भागातील ५०१ हुशार आणि गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची माहिती सहभागी सायकलिस्ट डॉ. रेहनुमा यांनी दिली.
दरम्यान आज कल्याणातील दुर्गाडी चौकापासून सुरू झालेला १८ जणांचा हा कल्याण ते दिल्ली सायकल प्रवास पुढील आठवडाभर चालणार आहे. दररोज दोनशे किलोमीटरचे अंतर कापण्याचा प्रयत्न हे सायकलपटू करणार आहेत. २ डिसेंबर रोजी म्हणजेच सातव्या दिवशी दिल्लीतील इंडिया गेट येथे या सायकल उपक्रमाचा समारोप होणार असल्याची माहिती सहभागी पोलिस अधिकारी नितीन सुर्यवंशी यांनी दिली.
अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, बीएनआय संघटनेचे संदीप शहा, कल्याण रोटरी क्लबचे डॉ. सुश्रुत वैद्य, कैलास देशपांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झेंडा दाखविण्यात आला. गेल्या वर्षी दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव मिळण्यासाठी या सायकल ग्रुपने कल्याण ते गोवा असा प्रवास केला होता.