खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे यश
कल्याण दि.1 डिसेंबर :
कल्याण डोंबिवली शहरांना थेट नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई या महानगरांशी जोडून शहरांतर्गत वाहतुकीचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या कल्याण तळोजा मेट्रो १२ मार्गिकेच्या (kalyan taloja metro 12)प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे. मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने ( एमएमआरडीए) १ हजार ८७७.८८ कोटींची निविदा यासाठी जाहीर केली असून कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (Mp Dr Shrikant shinde)यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. एकूण ५ हजार ६०० कोटी खर्चातून उभारण्यात येत असलेल्या या मेट्रो मार्गाच्या उभारणीत हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असून तो पूर्ण झाल्यास लवकरच कल्याण तळोजा ही ‘मेट्रो १२’ प्रवासांच्या सेवेत येणार आहे. या भागातील वाहतूक व्यवस्थेसाठी हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार आहे. (Kalyan Taloja Metro-12 tender announced by MMRDA; A game changer project for the transportation system)
कोंडीमुक्त आणि वेगवान प्रवासासाठी अथक प्रयत्न…
ठाणे कल्याण वाहतूक व्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलून नागरिकांना कोंडीमुक्त आणि वेगवान प्रवास करता यावा यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे सातत्याने नवनवीन प्रकल्पांना प्राधान्य देत आहेत. आतापर्यंत कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि ठाणे जिल्ह्यातील इतर अनेक राज्यमार्ग, महामार्गांना जोडण्यासाठी महत्त्वाचे प्रकल्प डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पूर्णत्वास गेले आहेत. अनेक प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहेत. रस्ते, रेल्वे, मेट्रो यासारख्या वाहतुकीच्या साधनांना नवे स्वरूप देण्याचे प्रयत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करीत आहेत. यामुळेच आतापर्यंत काटई ऐरोली उन्नत मार्ग, कल्याण रिंग रोड, शिळफाटा महापे उड्डाणपूल, शिळफाटा कल्याण रस्त्याचे सहापदरीकरण, काटई आणि नेवाळी येथे उड्डाणपूल, विठ्ठलवाडी ते थेट कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा उन्नत मार्ग आणि विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण, उड्डाणपूलांची उभारणी, रेल्वेची पाचवी सहावी मार्गिका अशी कामे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मार्गी लागली आहेत.
मेट्रो १२ हा प्रकल्प लागतोय वेगाने मार्गी…
यातच आता रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला नवा पर्याय देणारे मेट्रो प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशात सुरू असताना ठाणेपल्याडचा कल्याण आणि डोंबिवली शहरांना ठाणे, भिवंडी, नवी मुंबई आणि थेट मुंबईशी जोडणारा मेट्रो १२ हा प्रकल्प वेगाने मार्गी लागतो आहे. सुमारे ५ हजार ६०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे गेल्या वर्षात सर्वेक्षण पूर्ण झाले होते. नुकतीच एमएमआरडीएने या मेट्रोच्या स्थापत्य बांधकामासाठी निविदा जाहीर केली आहे. एकूण १ हजार ८७७.८८ कोटींची ही निविदा असून यात १७ स्थानके तसेच मेट्रो ५ आणि मेट्रो कारशेडला जोडणाऱ्या मार्गिकेचे बांधकाम केले जाणार आहे. मेट्रो १२ च्या उभारणीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आग्रही आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुरावामुळे अवघ्या काही महिन्यात मेट्रोच्या प्रत्यक्ष बांधकामाची निविदा जाहीर झाली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यास अवघ्या काही दिवसात मेट्रोच्या कामाला सुरुवात होणार आहे. मेट्रो मार्गाच्या उभारणीतील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असून हा वेगाने मार्गी लागल्यानंतर हा मेट्रो मार्ग प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
वाहतूक व्यवस्थेसाठी गेम चेंजर ठरणार – खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे
कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि आसपासच्या भागाला वाहतुकीचे नवे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पायाभूत सुविधांचे अनेक मोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. येत्या दोन ते तीन वर्षात रेल्वे, रस्ते यासह मेट्रो आणि जलवाहतुकीचेही पर्याय येथील प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. कल्याण डोंबिवली या शहरांना थेट ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईशी जोडणाऱ्या या कल्याण तळोजा मेट्रो १२ मार्गाच्या कामाला सुरुवात होणार असून या मार्गाच्या उभारणीमुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. ठाणेपल्याडची उपनगरे नवी मुंबई आणि मुंबईला जोडणारा हा प्रकल्प वाहतूक व्यवस्थेसाठी गेम चेंजर ठरणार आहे.