Home ठळक बातम्या कल्याण-तळोजा मेट्रो : स्थानकं उभारणीसाठी १ हजार ५२१ कोटींची निविदा जाहीर

कल्याण-तळोजा मेट्रो : स्थानकं उभारणीसाठी १ हजार ५२१ कोटींची निविदा जाहीर

 

खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

कल्याण दि.17 फेब्रुवारी :

कल्याण – तळोजा उन्नत मेट्रोच्या (मेट्रो – १२) उभारणीला लवकरच सुरूवात होणार असून प्रत्यक्ष मार्गिका उभारणी आणि मार्गातील १७ उन्नत स्थानकांच्या बांधकामासाठी एमएमआरडीएकडून १ हजार ५२१ कोटींची निविदा जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच कल्याण येथील लोकार्पण कार्यक्रमात कल्याण – तळोजा मेट्रो मार्गाला लवकरच गती प्राप्त होणार असल्याचे सांगितले होते. यानंतर अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीतच या मेट्रो मार्गिका आणि मार्गातील १७ स्थानकांच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामाच्या १ हजार ५२१ कोटी इतक्या कोटींच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. येत्या ३० महिन्यात हे काम पूर्ण केले जाणार असून लवकरच मेट्रो १२ प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या प्रकल्पाचा सातत्याने पाठपुरावा करत असून हा मार्ग आता दृष्टीपथात आला आहे.

ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रोचे विस्तारित रूप…

ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रोचे विस्तारित रूप म्हणून कल्याण-तळोजा मेट्रो मार्गाकडे पहिले जाते. या मार्गाच्या उभारणीसाठी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सतत पाठपुरावा केला. अखेर या मार्गाच्या आणि यातील स्थानकांच्या प्रत्यक्ष बांधकामांच्या निविदा एमएमआरडीए प्रशासनाने जाहीर केल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे ठाणे पल्याड राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

20 किमी लांबीच्या मार्गावर 17 स्थानके…

मुंबईसह ठाणे आणि ठाणेपल्याड कल्याण- डोंबिवली या शहरांसाठीही मेट्रो मार्गाची उभारणी केली जाते आहे. या अंतर्गत ठाणे – भिवंडी – कल्याण या मेट्रो मार्गाची उभारणी वेगाने सुरू आहे. हा मार्ग पुढे कल्याणपासून डोंबिवली आणि कल्याण तालुक्यातील काही गावे तसेच पुढे तळोजापर्यंत जाणार आहे. एकूण २० किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून यात १७ स्थानके आहेत. या मार्गाच्या उभारणीमुळे कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्र, कल्याण तालुक्यातील ग्रामीण भाग थेट नवी मुंबई, तळोजा या भागांशी जोडला जाणार आहे. या उन्नत मेट्रोची प्रत्यक्ष मार्गिका उभारणी आणि स्थानकांच्या बांधकामांची १ हजार ५२१.८ कोटी रुपयांच्या निविदा जाहीर करण्यात आल्या. यामुळे लवकरच या मार्गाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. तर येत्या अडीच वर्षाच्या कालावधीत या मार्गाचे बांधकाम पूर्ण होणार आहे.

या मेट्रोचा कल्याण डोंबिवलीसह या शहरांना फायदा…

या मार्गाला गती मिळावी यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने बैठका घेत पत्रव्यवहार करत होते. त्यानंतर या मार्गाचे सर्वेक्षण करून त्यासाठीच्या सखोल आरेखन सल्लागार नेमणुकीसाठीच्या निविदा नुकत्याच जाहीर केल्या होत्या. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच कल्याण येथे पार पडलेल्या लोकार्पण सोहळ्यात कल्याण – तळोजा मेट्रोचे काम लवकरच प्रगतीपथावर आणण्यात येईल असे सांगितले होते. यानंतर अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीतच या मार्गाच्या प्रत्यक्ष उभारणीच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहे. या निविदेमुळे या उन्नत मेट्रो मार्गाच्या उभारणीचे काम लवकरच सुरू होणार असून ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेलमधील नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.

…या स्थानकांचा असणार समावेश
कल्याण तळोजा (मेट्रो १२) अंतर्गत गणेश नगर, पिसावली गाव, गोलवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे आणि कोळेगाव, निळजे गाव, वडवली(खुर्द), बाळे, वाकलन, तुर्भे, पिसार्वे डेपो, पिसार्वे आणि तळोजा या स्थानकांचा समावेश आहे.

निश्चित कालावधीच्या आधीच या मार्ग पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील – डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा मतदारसंघ

कल्याण तळोजा मेट्रो मार्गिका आणि स्थानकांच्या प्रत्यक्ष बांधकामांच्या निविदा जाहीर झाल्या असून या प्रकल्पाची पायाभरणी लवकरच होणार आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. तर निश्चित कालावधीच्या आधीच या मार्ग पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहोत अशी प्रतिक्रिया खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा