
कल्याण दि.9 ऑक्टोबर :
एमआयडीसीची मोठी जलवाहिनी आज सकाळच्या सुमारास फुटल्यामुळे पुन्हा एकदा कल्याण – शिळ रोड जलमय झालेला पाहायला मिळत आहे. आज सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
गेल्या अनेक महिन्यांपासून कल्याण शिळ रोडवर एमआयडीसीची जलवाहिनी फुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आज सकाळी देसाई गावाजवळ आणि खिडकाळेश्वर मंदिर अशा दोन ठिकाणी ही जलवाहिनी फुटली आहे. ज्याठिकाणी ही जलवाहिनी फुटली आहे त्या परिसरात अक्षरशः पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. एवढ्या प्रचंड वेगाने पाणी बाहेर पडत आहे. कल्याण शिळ मार्गावर पाणी आल्यामुळे वाहनांना त्यातूनच वाट काढावी लागली. तर इथल्या रस्त्याला नदीचेच स्वरूप आले असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना याठिकाणी धाव घ्यावी लागली.
दरम्यान वारंवार घडणाऱ्या या जलवाहिनी फुटण्याच्या घटना थांबणार तरी कधी असा संतप्त प्रश्न स्थानिक विचारत आहेत.