
कल्याण मेट्रोच्या मागणीबाबत घेतली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट
कल्याण दि.6 मार्च :
कल्याणमधील प्रस्तावित मेट्रोच्या मार्गाबाबत वेगवेगळे मतप्रवाह असताना आता ही मेट्रो खडकपाडामार्गे नव्हे तर पूर्वीच्याच लालचौकीमार्गे नेण्याची मागणी केडीएमसीचे माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी केली आहे. यासंदर्भात समेळ यांनी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची भेट घेत ही मागणी केली. (Kalyan Metro: It should be taken via Lalchowki, not Khadakpada – Former House Leader Shreyas Samel)
साधारणपणे सहा वर्षांपूर्वी कल्याणातील मेट्रो प्रकल्पाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले होते. ठाणे – भिवंडी आणि मग भिवंडीतून कल्याणमध्ये येणारी ही मेट्रो दुर्गाडी -लालचौकी मार्गे पुढे कल्याण-तळोजा या मेट्रो 12 प्रकल्पाला जोडण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र लालचौकीऐवजी ही मेट्रो दुर्गाडी -आधारवाडी -खडकपाडा मार्गे नेण्याची आग्रही मागणी एमसीएचआय कल्याण डोंबिवलीचे तत्कालीन अध्यक्ष आणि शिवसेना पदाधिकारी रवी पाटील यांनी लावून धरली. त्यावर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत ही कल्याण मेट्रो आधारवाडी – खडकपाडामार्गेच होईल असे एमसीएचआय प्रॉपर्टी एक्स्पोमध्ये जाहीरही केले. आणि त्यानुसार मग नव्या मेट्रो मार्गाचा डीपीआरही तयार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
मात्र शिवसेनेचेच माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी या नव्या मार्गावर आक्षेप घेत यामुळे मेट्रोच्या खर्चात तब्बल 1 हजार कोटींची वाढ तर होईलच तसेच कल्याण – तळोजा या मेट्रो 12 प्रकल्पाला जोडण्याच्या कामातही अनेक तांत्रिक अडचणी असल्याचे समेळ यांनी म्हटले आहे. परिणामी नागरिकांच्या कररुपी पैशांची बचत होण्यासह मेट्रो प्रकल्पाची योग्य कनेक्टिव्हिटी पाहिजे असेल तर जुन्या म्हणजेच लालचौकी मार्गेच ही मेट्रो नेण्याची आग्रही मागणी श्रेयस समेळ यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यावर खासदार डॉ. शिंदे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत अभ्यास करून यातून मार्ग काढू असे आश्वासन दिल्याचे समेळ यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
मेट्रो मार्गाबाबत श्रेयस समेळ यांनी उपस्थित केलेले ठळक मुद्दे…
१. कोणत्याही मेट्रो लाईनची सुरुवात जर कोणत्याही रेल्वे स्टेशन च्या जवळून करण्यात आली तर त्यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो व त्याचा उपयोग जास्तीत जास्त नागरिक घेऊ शकतात. उदा घाटकोपर मेट्रो स्टेशन व अंधेरी मेट्रो स्टेशन. जर सदर मेट्रो बिर्ला कॉलेज मार्गे नेण्यात आली तर कल्याण स्टेशनवरून त्याचे अंतर ३ कि मी आहे. ज्यामुळे तिथे जाण्या-येण्यास नागरिकांचा वेळ आणि पैसे दोन्हीही वाया जातील. तसेच शहरात वाहतूक कोंडी निर्माण होईल. ज्यामुळे नागरिक मेट्रोचा वापर करणे टाळून थेट रिक्षा करून भिवंडी किंवा लोकल ट्रेन घेऊन ठाणे गाठतील.
२. तसेच मेट्रो-५ जर बिर्ला कॉलेज मार्गे नेण्यात आली तर सदर मेट्रो लाईन ला भविष्यात होणारी कनेक्टिव्हिटी करण्यास शक्य होणार नाही उदाः मेट्रो-१२ (कल्याण-तळोजा) जा) हि हि लाईन लाईन देखील प्रस्तावित असून सदर लाईन मेट्रो-५ ला APMC वरून जोडण्यात येणार आहे. बिर्ला कॉलेज मार्गे मेट्रो-५ नेल्यास, मेट्रो-१२ ला जोडण्यास शक्य होणार नाही. याचे कारण असे कि बिर्ला कॉलेज मार्गे मेट्रो नेल्यास भवानी चौकातून मुरबाड रोड मार्गे मेट्रो ५ व मेट्रो १२ जोडायची असेल, तर आधीपासून स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेला सौटस प्रकल्प थांबवून किंवा तो तोडून किंवा त्याच्या वरून मेट्रो लाईन न्यावी लागेल, जे व्यावहारिक दृष्ट्या शक्य होणार नाही. त्यामुळे मेट्रो-५ चा विस्तार खुटणार आहे.
३. तसेच MMRDA कडून विठ्ठलवाडी-कल्याण नगर उन्नत मार्गाला रुपये ६४२.९८ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, सदर काम प्रगतीपथावर आहे, सदर ब्रिजचा एक आर्म हा भवानी चौक ते कल्याण-मुरबाड रोड येथे उतरणार असून, सदर आर्म मेट्रो लाईन ला अडथळा निर्माण करणारा आहे, त्यामुळे या रस्त्यावरून मेट्रो लाईन नेणे शक्य होणार नाही.
४. तसेच बिर्ला कॉलेज मार्गे मेट्रो लाईन नेल्यास, त्याचे अंतर साधारण ३ कि मी नी वाढणार असून मेट्रो बनविण्याचा खर्च अंदाजे रुपये १००० कोटींनी वाढणार आहे असे समजते. त्यामुळे नागरिकांच्या कर रुपी पैशांचा विपर्यास होईल हे नक्की.
दरम्यान कल्याण मेट्रोची गेल्या सहा वर्षांत झालेली प्रगती पाहता सध्या तरी हा प्रकल्प आपल्यासाठी केवळ दिवास्वप्नच असल्याची भावना इथले नागरिक व्यक्त करत आहेत.