600 अधिकारी आणि कर्मचारी मतमोजणीसाठी सज्ज
कल्याण दि.31 मे :
कल्याण लोकसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज असून विधानसभानिहाय 84 टेबल्सवर मतमोजणीच्या 29 फेऱ्या होणार असल्याची माहिती कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे. तसेच या मतमोजणीसाठी नुकतेच प्रशिक्षण संपन्न झाले.
लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान गेल्या 20 मे रोजी संपन्न झाले. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तीन लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी मतदान झाले. त्यापैकी कल्याण लोकसभा मतदार संघाची मतमोजणी डोंबिवली पूर्वेतील वै. ह. भ. प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कै.सुरेंद्र वाजपेयी बंदीस्त क्रीडागृहात केली जाणार आहे. येत्या मंगळवारी म्हणजेच 4 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.
या मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे पहिले प्रशिक्षण शिबीर 28 मे 2024 रोजी डोंबिवली (पूर्व) येथील सावित्रीबाई फुले कलामंदिरात संपन्न झाले. तर मतमोजणीचे दुसरे प्रशिक्षण शिबीर (रंगीत तालीम) सोमवारी 3 जून 2024 रोजी सकाळी 6.00 वाजता डोंबिवली पूर्वेतील वै.ह.भ.प.सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील कै.सुरेंद्र वाजपेयी बंदीस्त क्रीडागृहात घेण्यात येणार आहे.
मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १४ याप्रमाणे 6 विधानसभा मतदारसंघ मिळून एकूण ८४ टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार असून, मतदानाच्या एकूण २९ फे-या होणार आहेत. या मतमोजणी कामी एकूण ६०० अधिकारी व कर्मचारी (पोलीस स्टाफ वगळून) वर्गाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली आहे.