
कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे दिमाखदार सोहळ्यात लोकार्पण
कल्याण दि.13 एप्रिल :
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जनसामान्यांमध्ये पोहोचवण्याचे महत्वाचे कार्य कल्याण येथे उभारण्यात आलेल्या ज्ञान केंद्रांच्या माध्यमातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करत आहेत. अशी ज्ञान केंद्रे संपूर्ण राज्यात उभारली जातील, अशी घोषणा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी कल्याण येथे केली. कल्याण पूर्वेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.(Kalyan-like knowledge centers that will convey Babasaheb’s thoughts will be set up across the state – Ministers Uday Samant and Sanjay Shirsath announce)
रविवारी कल्याण पूर्वेतील ड प्रभाग समिती कार्यालयाच्या आवारात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात देशातील आगळ्यावेगळ्या ज्ञान केंद्राचे लोकार्पण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट होलोग्राफी, विविध माहितीपटाच्या माध्यमातून येथे उलगडण्यात आला आहे. शेकडो पुस्तकांचे ग्रंथालयही यात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास, त्यांचे साहित्य, त्यांची आंदोलने आणि विचार होलोग्राफीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी आता कल्याणकरांना मिळणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयाशेजारी उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील ज्ञान केंद्राचे लोकार्पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला १३ एप्रिल रोजी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे अपरिहार्य कारणामुळे दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होते.
यावेळी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या स्मारकाचा प्रवास उलगडून सांगितला. स्थानिकांची मागणी होती त्यानुसार हे स्मारक उभे राहिले. यात संघर्ष समितीपासून अनेकांचे योगदान आहे, असे यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. परस्पर संवादी (इंटरॅक्टिव) पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जीवनगाथा कळावी हे ज्ञान केंद्र उभारण्या मागचा मुख्य हेतू होता. या केंद्रात एक ते दीड तासात आगळावेगळा अनुभव मिळेल. या स्मारकासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि पाठबळ देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही डॉ. शिंदे यांनी आभार मानले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपूर्वी स्मारकातील ज्ञान केंद्र सुरू करू असा आम्ही दिलेला शब्द आज पूर्ण केला, असेही यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले.
नागरिकांच्या मागणीनुसार आणि वेगळ्या संकल्पना अंमलात आणण्यासाठी इच्छाशक्ती लागते, ती इच्छाशक्ती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे आहे, असे गौरवोद्गार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी यावेळी काढले. या स्मारकाची कॉपी आम्हीही करणार. राज्यभर असे ज्ञान केंद्र उभारणार अशी घोषणा यावेळी मंत्री संजय शिरसाठ यांनी केली. तर बाबासाहेबांचे विचार जनसामान्यांमध्ये पोहोचवण्याचे काम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे करत आहेत. ही संकल्पनाच खूप मोठी आहे. त्यामुळे असे ज्ञानकेंद्र संपूर्ण राज्यात उभे करायला हवेत, असे मत यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. या ज्ञान केंद्राची प्रतिकृती आम्हीही साकारणार असेही यावेळी सामंत म्हणाले. ज्या रत्नागिरीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपुत्र आहे, त्याच जिल्ह्याचा मी पालकमंत्री असल्याचा मला अभिमान आहे, असेही सामंत यावेळी म्हणाले. लोकांच्या मागण्या पूर्ण करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. खासदार श्रीकांत शिंदे कायमच नागरिकांच्या मागण्या पूर्ण करतात. मी कल्याणमध्ये जेव्हा प्रचारासाठी आलो, तेव्हा लोक म्हणाले तुम्हाला यायची गरज नाही. खासदार आधीच निवडून आलेले आहेत, हा विश्वास इथल्या जनतेने दाखवला असेही कौतुक यावेळी सामंत यांनी केले.
या दिमाखदार सोहळ्या शेकडोच्या संख्येने भीम बांधव उपस्थित होते. तसेच याप्रसंगी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, कल्याण पू्र्वच्या आमदार सुलभा गायकवाड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे आण्णा रोकडे, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, शिवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, निलेश शिंदे, प्रशांत काळे, महेश गायकवाड, किरण सोनावणे, रमाकांत देवळेकर, शिवसेना, भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.