कल्याण – डोंबिवली दि.17 मे :
तौक्ते चक्रीवादळामूळे आज सकाळपासून कल्याण डोंबिवलीत अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत. तर महावितरणच्या वीज वाहिन्या आणि खांबांचेही मोठे नुकसान झाले असून याचा परिणाम कल्याण डोंबिवलीतील वीज पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे महावितरणचे सर्व अभियंता आणि कर्मचारी युद्ध पातळीवर हा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी काम करत आहेत. (Cyclone Takutatae: Hurricane has major impact on power supply in kalyan Dombivali; MSEDCL starts work on battlefield)
आज सकाळपासूनच वाऱ्याचा वेग लक्षणीयरीत्या वाढला असून अनेक ठिकाणी मोठमोठी झाडं उन्मळून पडली आहेत. तर यामध्ये बहुतांश ठिकाणी ही झाडं महावितरणच्या वीज वाहिन्या किंवा वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेवर पडल्याने संबंधित परिसराचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. कल्याण पूर्व- पश्चिम, डोंबिवली आदी विभागीय कार्यालयांतर्गत असे प्रकार घडल्याने त्याचा वीज पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. चक्रीवादळाच्या भीषण वेगामुळे झाडे ,लोखंडी पत्रे उडून लाईनवर पडत असल्याने लाईन वारंवार बंद होत आहेत. अशा परिस्थितीतही महावितरणचे सर्व कर्मचारी आणि अभियंते वीजपुरवठा सुरळीत करण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. परंतु वादळामुळे काम करण्यात खूपच अडचणी येत असून चक्रीवादळ कमी होईपर्यंत अधिक वेगाने काम करता येणार नसल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले. त्यामूळे वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत कृपया ग्राहकांनी संयम बाळगण्यासह महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.