कल्याण दि.28 ऑक्टोबर :
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या अधिकृत उमेदवार भाजपच्या सुलभा गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असतानाच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी बंडखोरी करत जोरदार शक्तिप्रदर्शनाद्वारे अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी बंडखोरांना दिलेल्या कारवाईच्या इशाऱ्यानंतरही कल्याण पूर्वेतील या बंडखोरीवरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसत आहेत. (Kalyan East Assembly: Application filed by Shiv Sena’s rebel candidate Mahesh Gaikwad)
राजकीयदृष्ट्या ठाणे जिल्ह्यातील सर्वात हॉट आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या कल्याण पूर्वेमध्ये यंदा महायुतीकडून सुलभा गणपत गायकवाड यांना अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. मात्र शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यावर आक्षेप घेत दंड थोपटले आहेत.
तर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महायुतीचा धर्म पाळावा, ज्याठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत तिकडे बंडखोरी करू नये. तसेच बंडखोरांना साथ देऊ नये असा सज्जड इशारा वजा दमच शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आला. मात्र त्यानंतरही कल्याण पूर्वेतून महेश गायकवाड यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवार सुलभा गायकवाड यांच्याविरोधात बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान महेश गायकवाड यांनी आज सकाळी प्रचंड शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून कल्याण पूर्वेचा विकास करण्यासाठीच आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. तसेच भाजपाने आम्हाला युती धर्म शिकवू नये, भाजपाच्या याच उमेदवाराने लोकसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात प्रचार केला, डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधी उमेदवारासोबत गळाभेटी घेतल्या तेव्हा युतीधर्म कुठे गेला होता ? असे बोचरे प्रश्नही महेश गायकवाड यांनी उपस्थित केले आहेत.