यंदाच्या मौसमातील सर्वात कमी तापमान नोंद
कल्याण डोंबिवली दि.29 नोव्हेंबर :
यंदा नोव्हेंबर महिन्याची डिसेंबरकडे होणारी वाटचाल चांगलीच गारेगार होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी 15 अंशावर आलेले कल्याण डोंबिवलीचे तापमान हे आणखी खाली आले असून कल्याणात 13.5 तर डोंबिवलीत 14.2 इतक्या निच्चांकी तापमानाची आज नोंद झाली. विशेष म्हणजे यंदाच्या मौसमातील हे सर्वात कमी तापमान असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनशी बोलताना दिली आहे.
गेल्या वर्षी काहीशी उशिराने आणि काहीसा कमी मुक्काम केलेल्या थंडीने यंदा अगदी वेळेमध्येच आगमन केले नाहीये. तर अगदी सुरुवातीपासूनच आपल्या गुलाबी थंडीची चुणूक दाखवून दिली आहे. दिवाळी झाली आणि नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमानात घसरण जाणवू लागली होती. तर आताच्या सुरू असलेल्या आठवड्यात तर थंडीने कमाल करत यंदाच्या मौसमातील आपल्या किमान तापमानाची नोंद केली.
दोनच दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण एमएमआर रिजनमध्ये तापमान लक्षणीयरित्या कमी नोंदवले गेले. 26 नोव्हेंबरला यंदाच्या मौसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद होऊन कल्याणमध्ये 15 अंश सेल्सिअस तर डोंबिवलीत 15.7 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली होती. त्यापाठोपाठ आज दोनच दिवसांत इथल्या तापमानामध्ये आणखी घसरण होऊन आज कल्याणमध्ये 13.5 आणि डोंबिवलीमध्ये 14.2 अंश सेल्सिअस सेल्सिअस इतके कमी तापमान नोंद झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे.
तर यापूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार उद्यापर्यंत थंडीचा हा कडाका असाच कायम राहणार आहे. मात्र १ डिसेंबर पासून वातावरण बदल होणार असून दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये वादळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्याचे परिणाम महाराष्ट्रातही होणार असून ढगाळ वातावरणामुळे इकडचे तापमान वाढेल. आणि हळूहळू थंडी कमी होऊन तापमानाचा पारा पुन्हा वाढून २० पार जाईल. सुरुवातीचा पहिला आठवडा त्याचा प्रभाव रहाणार असल्याचे मोडक यांनी सांगितले.
एमएमआर रिजनमधील इतर शहरांचे तापमान…
कल्याण 13.5
डोंबिवली 14.2
कर्जत 12
बदलापूर 11.9
अंबरनाथ 12.9
उल्हासनगर 13.2
पलावा 13.6
पनवेल 13.7
पालघर 14.5
ठाणे 15.7
नवी मुंबई 15.3