शहरातील झाडांची संख्या गेल्या दशकभरात झाली तिप्पट
कल्याण डोंबिवली दि.14 ऑक्टोबर :
एकीकडे सिमेंट काँक्रीटचे जंगलं आणि टोलेजंग इमारतींची संख्या लक्षणीयरित्या वाढत चाललेल्या असताना कल्याण डोंबिवलीत राहणाऱ्या नागरिकांसाठी एक गुड न्युज आहे. केडीएमसीकडून गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या वृक्षगणनेचा सखोल अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून कल्याण डोंबिवली शहरांची “सिटी ऑफ ट्रीज”कडे वाटचाल झाल्याचे दिसून येत आहे. या वृक्ष गणनेमध्ये कल्याण डोंबिवलीत 206 विविध प्रजातींचे तब्बल 7 लाख 36 हजार 5 इतके वृक्ष आढळून आले असून त्यापैकी 2 हजार 14 पुरातन (हेरिटेज ट्री) वृक्ष असल्याचे निदर्शनास आले आहे. (Kalyan Dombivli’s move to “City of Trees”; More than 7 lakh trees were found in tree census)
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शहरांतील झाडांची मोजणी…
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे पहिल्यांदाच अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शहरांतील झाडांची मोजणी करण्यात आली. ज्यामध्ये जिओ टॅगिंग, झाडांचे पारंपरिक नाव – शास्त्रीय नाव, त्याचे वयोमान, आकार, प्रजाती, त्यांचे आरोग्य आदी प्रमूख मुद्द्यांचा समावेश आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये तब्बल 7 लाख 36 हजार वृक्ष आढळून आले असून त्यापैकी 5 लाख 71 हजार भारतीय मूळ प्रजातीची (कडुनिंब, बोर, आंबा, पिंपळ, वड, उंबर) तर 1 लाख 44 हजार परदेशी प्रजातीची (गुलमोहर, सोनमोहर, विलायती बाभूळ, मनिला पाम, फॉक्सटेल पाम, विलायती चिंच, रॉयल पाम) झाडं आणि 2 हजार 14 पुरातन वृक्षसंपदा असल्याचे निदर्शनास आले आहे.
98.07 टक्के म्हणजेच 7 लाख 26 हजार 86 झाडं सुदृढ…
विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या या 7 लाख 36 हजार झाडांपैकी 98.07 टक्के म्हणजेच 7 लाख 26 हजार 86 झाडं ही सुदृढ (चांगले आरोग्य असणारी) आढळली असल्याची माहिती मुख्य उद्यान अधीक्षक तथा वृक्ष अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे. तर 2007 मध्ये झालेल्या वृक्षगणनेत कल्याण डोंबिवलीत अवघे 2 लाख 40 हजार इतकी वृक्षसंपदा आढळून आली होती. ज्यामध्ये गेल्या दीड दशकभरात जवळपास तिप्पट संख्येने वाढ झाल्याचे सध्याच्या या अहवालावरून दिसत आहे. तसेच केडीएमसीच्या कल्याण पश्चिमेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये सर्वाधिक म्हणजेच 73 हजार 577 तर प्रभाग क्रमांक 33 मध्ये सर्वात कमी 419 वृक्ष असल्याचे याद्वारे निदर्शनास आले आहे.
या वृक्षवाढीला हे घटक ठरले कारणीभूत…
इतक्या मोठ्या संख्येने नागरीकरण होत असतानाही कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील झाडांची वाढलेली लक्षणीय संख्या पाहता मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्याकडून त्यामागची कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर विकासकाला प्रत्येक 100 स्क्वेअर मीटरमागे 1 झाड लावणे बंधनकारक करणे, सर्व रस्ते दुभाजक आणि डीपी रस्त्यांच्या दुतर्फा महापालिकेचा एकही रुपया खर्च न करता सीएसआर निधीमधून झालेले वृक्षारोपण, शहरांतील राखीव भूखंड – वन जमिनी आदींवर सामजिक संस्थांमार्फत वाढत चाललेले वृक्षारोपण आदी घटक या वृक्षवाढीला कारणीभूत असल्याचे संजय जाधव यांनी स्पष्ट केले.
सिटी ऑफ ट्रिज”च्या दिशेने वाटचाल…
तर इतक्या कमी क्षेत्रफळ असणाऱ्या आणि सर्वात वेगानं नागरीकरण होणाऱ्या महापालिका क्षेत्रात इतक्या भरगच्च संख्येने असणाऱ्या वृक्ष संपदेची दखल ही राज्यांतील इतर महापालिकांनी घेतली आहे. तसेच गलिच्छ सिटीकडून “सिटी ऑफ ट्रिज”च्या दिशेने होणारी ही वाटचाल शहरातील प्रत्येक नागरिकासाठी नक्कीच अभिमानास्पद ठरेल यात शंका नाही.