बदलापूरमध्ये तर पारा आला थेट १० अंशांवर
कल्याण डोंबिवली दि.२१ नोव्हेंबर :
गेल्या तीन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्हा सध्या थंडीने गारठून गेला असून लक्षणियरित्या कमी झालेले तापमान पाहता ही थंडीची लाटसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर कल्याण डोंबिवलीपासून ते बदलापूरपर्यंतच्या पट्ट्यामध्ये आज गेल्या दहा वर्षांतील निच्चांकी तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे.
बदलापुरात सर्वात कमी तापमान…
गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या किमान तापमानात सातत्याने घट होताना दिसत आहे. तर कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरी भागातील तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. त्यातही सर्वात कमी तापमानाची नोंद होण्यात बदलापूर शहर सध्या आघाडीवर दिसत आहे.
बदलापुरात १० तर कल्याण डोंबिवलीत १२ अंश सेल्सिअस…
गेल्या तीन दिवसांतील या थंडीच्या लाटेसदृश्य परिस्थितीमध्ये बदलापूर शहरात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी (२१ नोव्हेंबर२०२२) बदलापूरमध्ये तर १०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्येही तापमानाचा पारा थेट १२ अंशांवर आला असून गेल्या दहा वर्षांतील हे सर्वात निच्चांकी किमान तापमान असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे.
घरबसल्या हिलस्टेशनची अनुभूती…
सध्या आपल्यापैकी अनेक जणांनी फिरायला जाण्यासाठी महाबळेश्वर, पाचागणी, सातारा आदी ठिकाणांना पसंती दिली आहे. मात्र या हील स्टेशनवर असणाऱ्या तापमानाची अनुभूती सध्या कल्याण डोंबिवलीकरांना घरबसल्या अनुभवायला मिळत असल्याने सगळेच जण खुशीत आहेत. मात्र एकीकडे किमान तापमान रेकॉर्डब्रेक घसरत असले तरी दुसरीकडे दिवसाचे कमाल तापमान हे ३२ ते ३५ अंशांच्या दरम्यानच दिसत आहे.
विविध भागातील आजचे किमान तापमान
बदलापूर – 10.3 अंश सेल्सिअस
कल्याण – 12.8
डोंबिवली – 13.4
उल्हासनगर – 12.3
कर्जत – 10.5
ठाणे – 15.4
नवी मुंबई – 16
मुंबई – 17
तलासरी – 11.2