Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीकरांनी पुसून काढला तो डाग; वाढीव मतदान करत रचला नवा अध्याय

कल्याण डोंबिवलीकरांनी पुसून काढला तो डाग; वाढीव मतदान करत रचला नवा अध्याय

मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला ठरणार फायदेशीर?

कल्याण डोंबिवली दि. 21 नोव्हेंबर :
गेल्या काही सार्वत्रिक निवडणुकांपासून माथी पडलेला डाग पुसून काढण्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कल्याण डोंबिवलीकर यशस्वी ठरले आहेत. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या इथल्या मतदानात थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 15 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे आतापर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून मतदान वाढीसाठी करण्यात आलेल्या अथक प्रयत्नांना मतदार राजानेही तितक्याच जागरूकतेने प्रतिसाद दिला आहे. (Kalyan Dombivlikar erased that stain; A new chapter created by increasing voting)

महाराष्ट्रातील ग्रामीण भागापेक्षा अधिक सुशिक्षित मतदारांचे प्रमाण असूनही गेल्या दशकभरात झालेल्या निवडणुकांमध्ये कल्याण डोंबिवलीतील मतदानाच्या आकड्याने सतत कच खाल्ली होती. महाराष्ट्राचा सर्वात ग्रामीण दुर्गम भाग अशी ओळख असणाऱ्या गडचिरोलीमध्ये 65 टक्क्यांहून अधिक मतदान तर आपल्याकडे जेमतेम 40 टक्के. इतकी उदासीनता मतदानाबाबत इथल्या मतदारांमध्ये असल्याने साहजिकच निवडणूक आयोगालाही ही बाब खटकत होती. ती इतकी की केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य आयुक्तांकडून
प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये कल्याणचा जाहीर उद्धार केला जात होता.

मात्र मतदानाचा हा खालावलेला इथला टक्का वाढवण्यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने ज्याप्रमाणे प्रयत्न केले. त्याचीच पुनरावृत्ती किंवा त्यापेक्षा अधिक प्रयत्न या विधानसभा निवडणुकीत झालेले पाहायला मिळाले. आणि मतदार राजानेही अखेर आपल्या लोकशाहीने दिलेल्या सर्वात मोठ्या अधिकाराला जागत आपली भूमिका चोख बजावली. त्यामुळेच तर सर्वाधिक सुशिक्षित मतदार असूनही मतदानामध्ये मात्र सर्वात मागे असा माथी बसलेला काळा शिक्का पुसून काढण्यात इथले मतदार यशस्वी ठरले.

कल्याण डोंबिवलीतील कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीपेक्षा 11.57 टक्के, कल्याण पूर्वमध्ये 14.97 टक्के, डोंबिवलीमध्ये सर्वाधिक म्हणजे 15.47 टक्के आणि कल्याण ग्रामीणमध्ये 11.45 टक्के इतकी वाढ यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाल्याची माहिती ठाणे जिल्हा स्वीप नोडल अधिकारी संजय जाधव यांनी दिली. तसेच निवडणूक यंत्रणांच्या एकत्रित कामाचा आणि त्यांच्या एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम असल्याचेही ते म्हणाले.

कल्याण डोंबिवलीतील मतदारसंघातील आताच्या आणि 2019च्या आकडेवारीची तुलना

कल्याण पूर्व – 58.50% / 2019 मध्ये 43.53%

कल्याण पश्चिम – 54.75 / 2019 मध्ये 41.73%

डोंबिवली – 56.19% / 2019 मध्ये 40.72%

कल्याण ग्रामीण – 51.64% / 2019 मध्ये 46.36%

यामुळे वाढला कल्याण डोंबिवलीतील मतदानाचा टक्का…

लोकसभा निवडणुकीत नावं नसलेल्या मतदारांची शासन, राजकीय प्रतिनिधी यांच्याकडून झालेली परिणामकारक मतदार नोंदणी…

महाविद्यालयीन नवमतदारांनी उत्स्फूर्तपणे केलेली नोंदणी…

मतदान केंद्रांवर जिल्हा निवडणूक अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या “ॲशुअर्ड मिनीमम फॅसिलिटीज”(AMF)…

मतदान वाढीसाठी राजकीय पक्षांसोबत निवडणूक आयोगाच्या स्वीप यंत्रणेकडून दीड दोन महिन्यांपासून झालेली नियोजनबध्द प्रभावी जनजागृती…

मतदार यादीतील नावे शोधण्यासाठी घेण्यात आलेला QR कोडचा आधार…

यंदा पहिल्यांदाच मोठमोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये उभारण्यात आलेली मतदान केंद्रे…

या प्रमुख मुद्द्यांमुळे कल्याण डोंबिवलीतील मतदानाची आकडेवारी वाढण्यास कारणीभूत असून टीमवर्क शिवाय ही गोष्ट साध्य करणे अशक्य असल्याची प्रतिक्रिया ठाणे जिल्हा स्वीप नोडल अधिकारी संजय जाधव यांनी दिली.

केतन बेटावदकर
©️©️©️©️©️©️©️
LNN News

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा