कल्याण डोंबिवली दि. १४ ऑगस्ट :
एकीकडे हर घर तिरंगा अभियानामुळे सगळीकडेच उत्साहाचे वातावरण असतानाच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली शहरे तिरंगामय झालेली दिसत आहेत. कल्याण डोंबिवलीतील महत्वाच्या ठिकाणांसह प्रमूख वास्तूंना केडीएमसी प्रशासनाकडून अत्यंत सुंदर अशी तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे.
यंदाचा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवी म्हणजेच ७५ वा असल्याने केंद्र सरकारकडून यापूर्वीच हर घर तिरंगा (har ghar tiranga) अभियानाची घोषणा करण्यात आली. शनिवारपासून या अभियानाला सुरुवात झाली असून कल्याण डोंबिवलीतील देशप्रेमी नागरिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसत आहे. देशातील इतर शहरांप्रमाणेच कल्याण डोंबिवलीतील प्रत्येक घरावर नागरिकांनी अभिमानाने तिरंगा उभरल्याचे दिसत आहे.
तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनानेही स्वयंस्फूर्तीने घेतलेल्या एका निर्णयामुळे दोन्ही शहरांना वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे.
महापालिका प्रशासनातर्फे केडीएमसी मुख्यालयासह छत्रपती शिवाजी महाराज चौक, पत्रीपुल, डोंबिवलीतील शहीद मेजर विनयकुमार सच्चान स्मारक, डोंबिवली रेल्वे स्टेशन बाहेरील स्कायवॉक अशा प्रमूख वास्तूंना देखणी अशी तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे या वास्तूंसोबतच कल्याण डोंबिवली शहरही तिरंगामय झालेली दिसत आहेत.
केडीएमसी प्रशासनाकडून करण्यात आलेली ही आकर्षक रोषणाई नागरिकांचाही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहेत आणि नागरिकही सेल्फी काढण्यासाठी याठिकाणी गर्दी करत असल्याचे दिसत आहेत.