डोंबिवली दि.12 नोव्हेंबर :
दरवर्षी पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर कल्याण डोंबिवलीकरांना खड्ड्यांच्या समस्येला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागते. मात्र येत्या वर्षभरात कल्याण डोंबिवली खड्डेमुक्त होणार असल्याचा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. डोंबिवली पूर्वेपाठोपाठ डोंबिवली पश्चिमेतील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचे भूमिपूजन खासदार डॉ. शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शिवसेनेचे माजी स्थायी समिती सभापती आणि ज्येष्ठ पदाधिकारी रमेश म्हात्रे, युवासेना जिल्हाधिकारी दिपेश म्हात्रे आदी लोकप्रतिनिधींच्या प्रभागात या सिमेंट काँक्रीटच्या नविन रस्त्यांची कामे सुरू होणार आहेत.
निवडणुका आल्या म्हणून आम्ही काम करत नाही. निवडणूक आल्यावर भूमीपूजने करायची असे काम शिवसेना कधीच करत नाही. विकासकामांसाठी आवश्यक असणारी तांत्रिक मंजुऱ्यापासून ते वर्क ऑर्डरपर्यंतची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आम्ही काम करतो. तर विकासकामे करताना आम्ही कोणताही पक्षभेद केला नसून शिवसेनेसह भाजप, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस आदी सर्वपक्षीय नगरसेवक प्रभागात रस्त्यांसाठी सुमारे 20 ते 25 लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. येत्या काही महिन्यात कल्याण डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या कामांचा सुरुवात होणार असून त्यामुळे येत्या वर्षभरात कल्याण डोंबिवली शहरं खड्डेमुक्त होईल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, नाशिकचे संपर्कप्रमूख भाऊसाहेब चौधरी, माजी स्थायी समिती सभापती आणि ज्येष्ठ पदाधिकारी रमेश म्हात्रे, दिपेश म्हात्रे, युवासेनेचे आशुतोष सिंह यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.