कल्याण – डोंबिवली दि.२८ एप्रिल :
कल्याण डोंबिवलीचे तापमान आजही ४३ अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले गेले असून तापमानात कालच्यापेक्षा किंचित घट पाहायला मिळाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली. उष्णतेच्या लाटेमुळे कल्याण डोंबिवलीत काल गेल्या दहा वर्षांतील दुसरे उच्चांकी तापमान नोंदवले गेले होते.
गेल्या महिन्यापासून कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या उल्हासनगर, बदलापूर आदी परिसरात यंदा अतिशय कडक असा उन्हाळा जाणवत आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस तापमानामध्ये रेकॉर्ड ब्रेक अशी वाढ पाहायला मिळाली. तर या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही तसेच चित्र असून बुधवारी २७ एप्रिल २०२२ रोजी कल्याण डोंबिवलीत उच्चांकी तापमान नोंदवण्यात आले.
दुपारनंतर तापमान खाली उतरले मात्र आर्द्रताही वाढली – हवामान अभ्यासक अभिजीत मोडक
आज दुपारी 3 वाजण्याच्या आसपास समुद्री वारे वाहू लागल्याने आर्द्रताही झपाटय़ाने वाढत आहे. त्यापूर्वी वातावरणात आधी कोरडी गरम हवा असल्याने तापमान ४३ डिग्रीपर्यंत गेले. आणि त्याचवेळेस वातावरणात दमटपणा दाखल होताच
तापमान ४० अंशपर्यंत खाली उतरले. मात्र आर्द्रता ५० टक्क्यांवर पोहोचल्याने तापमान कमी होऊनही हीट इंडेक्सकडे (५५ अंश सेल्सिअस )झुकलेले पाहायला मिळाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.
आज नोंदवण्यात आलेले तापमान
कल्याण – ४३
डोंबिवली – ४२.८
भिवंडी – ४३.२
उल्हासनगर – ४२.७
बदलापूर – ४२.७
ठाणे – ४१.८
पलावा – ४४
कर्जत – ४४