आतापर्यंत झालीय ३० टक्के नालेसफाई
कल्याण – डोंबिवली दि. १९ मे :
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकूण 95 किमी लांबीचे 97 नाले असून पावसाळयापूर्वी मोठया- छोट्या नाल्यातील आणि गटारातील गाळ काढून ते स्वच्छ करण्याच्या सुचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच दिल्या आहेत. तर आतापर्यंत कल्याण डोंबिवलीत ३० टक्के नालेसफाई झाली असून ३१ मे पूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिले आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी पालिका क्षेत्रातील सांगळेवाडी पूलाजवळील जरीमरी नाला, कल्याण पूर्वेत पूना लिंक रोडजवळील लोकग्राम नाला, खडेगोळवली त्याचप्रमाणे डोंबिवलीच्या म्हसोबा चौकाजवळील खंबाळपाडा नाला तसेच नांदीवली पूलाजवळील नाला आदी नाल्यांची पाहणी करुन नाले सफाईच्या कामाचा आढावा घेतला. या पाहणीच्या वेळी शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, कार्यकारी अभियंता (जनि:) घन:श्याम नवांगुळ आणि इतर अभियंते उपस्थित होते.
आत्तापर्यंत सुमारे 30 टक्के नालेसफाईची कामे पूर्ण झाली असून नाल्यातून काढलेला गाळ त्वरीत उचलण्याच्या सुचनाही आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिल्या आहेत. तर नाल्यातून काढलेल्या गाळाच्या परिमाणानुसारच संबधित ठेकेदाराला देयक अदा केले जाणार असल्याचेही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.