Home ठळक बातम्या आयमेथॉनसाठी कल्याण नगरी सज्ज; आंतरराष्ट्रीय धावपटूही होणार सहभागी

आयमेथॉनसाठी कल्याण नगरी सज्ज; आंतरराष्ट्रीय धावपटूही होणार सहभागी

आतापर्यंत तब्बल ३ हजारांहून अधिक धावपटूंची नोंदणी

कल्याण दि.१२ नोव्हेंबर :
मुंबईनंतर मुंबईबाहेरील सर्वात मोठी अर्ध मॅरेथॉन स्पर्धा म्हणून नावलौकिक मिळवलेल्या कल्याणातील आयमेथॉन ३ साठी कल्याण नगरी सज्ज झाली आहे. उद्या म्हणजेच रविवारी १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या अर्ध मॅरेथॉनमध्ये आतापर्यंत तब्बल ३ हजारांहून अधिक धावपटूंनी नोंदणी केली आहे. ज्यामधे देशाच्या विविध राज्यांतील नामांकित खेळाडूंचा समावेश आहे. तर विशेष म्हणजे केनियाच्या आंतरराष्ट्रीय धावपटूही उद्याच्या या अर्ध मॅरेथॉनमध्ये सहभागी झाला आहे.

या स्पर्धेला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, गणपत गायकवाड, केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यंदाची ही तिसरी आयमेथॉन असून त्यामधून जमा होणारा निधी दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक कामांसाठी वापरण्यात येणार आहे. यावर्षीच्या स्पर्धेच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यातील ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेसह कल्याणच्या आसपास असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती आयोजक आणि इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली.

उद्याच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये मुंबई आणि कल्याण डोंबिवलीसह हरियाणा, उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, मध्यप्रदेश, चंदीगड आदी राज्यांतील धावपटूंनी नोंदणी केली आहे. तर केनियातील आंतरराष्ट्रीय धावपटू इसाक कीबेट हादेखील अर्ध मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे.

दुर्गाडी चौकातून प्रारंभ होणारी ही स्पर्धा ३ किमी, ५ किमी, १० किमी आणि २१ किमी (हाफ मॅरेथॉन) अशा चार विभागांत आयोजित करण्यात आली आहे. तर या स्पर्धेचा आवाका लक्षात घेता मुंबईनंतर मुंबईबाहेरील ही सर्वात मोठी अर्ध मॅरेथॉन ठरली असून त्यासाठी हजारो धावपटूंसह कल्याणकर सज्ज झालेले दिसत आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा