महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून येण्याचा व्यक्त केला विश्वास
कल्याण दि.13 एप्रिल :
आपल्याला आधी वाटायचे की कल्याण ही स्मार्ट सिटी आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून आपण इकडे फिरल्यावर आपल्या असे लक्षात आले या भागातील लोकप्रतिनिधींनी इकडे काहीच कामं केलेली नाहीयेत. शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत तर कल्याण हे आमच्या आदिवासी भागापेक्षा अधिक मागासलेले असल्याचे मत भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी कल्याणात आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात बोलताना सांबरे यांनी कोणाचेही नाव न घेता सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. (Kalyan city is more backward than tribal areas in terms of education and health – Bhiwandi Lok Sabha Independent Candidate Nilesh Sambare)
कोणत्या तोंडाने मतं मागायला येता ?
गेल्या काही दिवसांपासून आपण कल्याण शहर आणि टिटवाळा परिसरात 19 बैठका घेतल्या. मात्र या बैठकीतील एकाही व्यक्तीला आयटीआय म्हणजे काय हेच माहित नाही. मुंबई आणि ठाण्याला लागून असतानाही कल्याण शैक्षणिक आणि आरोग्याच्या विकासाच्या बाबतीत मागेच राहिले आहे. इथल्या नागरिकांकडून कर घेऊनही महापालिकेला एक सुसज्ज रुग्णालय देता येत नाही? असे असताना तुम्ही लोकांकडे कोणत्या तोंडाने मतं मागायला येता ? असा संतप्त सवाल सांबरे यांनी यावेळी केला.
सर्वाधिक मतांनी नक्कीच विजयी होवू…
तर पालघरसारख्या आदिवासी भागात आपण संपूर्णपणे मोफत सुविधा देणारे सुसज्ज रुग्णालय, अनेक आरोग्य केंद्र, सीबीएसईच्या शाळा, युपीएससी मार्गदर्शन केंद्र यांसारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्यामुळे आदिवासी भागातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्याचा मोठा फायदा होतोय. आपल्याला लोकांची आणखी सेवा करायची असल्याने आपण खासदार होण्यासाठी इच्छुक आहोत. इतरांप्रमाणे आपल्याला पैसे कमावण्यासाठी, आपले दुकान चालवण्यासाठी खासदार व्हायचे नाही अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. संपूर्ण महाराष्ट्रात आपण सर्वाधिक मतांनी नक्कीच विजयी होवू असा विश्वासही निलेश सांबरे यांनी यावेळी व्यक्त केला.
या मार्गदर्शन मेळाव्याला कल्याण परिसरातील अनेक युवक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनींनी मोठी गर्दी केली होती.