कल्याण दि.२९ नोव्हेंबर :
शास्त्रीय संगीताचा प्रचार – प्रसार या उद्देशाने स्थापन झालेली आणि गेल्या ९७ वर्षांपासून कार्यरत असणारी कल्याण गायन समाज ही भारतातील एक अग्रगण्य संस्था. या संस्थेतर्फे गेल्या २० वर्षांपासून देवगंधर्व महोत्सवाचे आयोजन केले जात असून यंदाच्या २१ व्या महोत्सवासाठी कल्याण नगरी सज्ज झाली आहे. येत्या १० आणि ११ डिसेंबरला आचार्य प्र.के.अत्रे रंगमंदिरात हा महोत्सव होणार आहे.
देशातील दिग्गजांनी घेतलाय सहभाग…
गेल्या दोन दशकांपासून आयोजित होणाऱ्या देव गंधर्व महोत्सवाचा देशातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मोजक्या संगीत महोत्सवात समावेश होतो. आतापर्यंत यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन, बासरी वादक पंडित हरिप्रसाद चौरसिया, शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान, सितारवादक नीलाद्री कुमार, गायिका कौशिकी चक्रवर्ती, व्हायोलिन वादक डॉ. एल. सुब्रमण्यम, गायक हरिहरन, सुरेश वाडकर यांच्यासारख्या आपापल्या क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी आपली कला सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे.
यांच्या सादरीकरणाने होणार महोत्सव शुभारंभ…
देवगंधर्व महोत्सवात पहिल्या दिवसाच्या सत्राची सुरुवात विदुषी मंजुषा पाटील यांच्या शास्त्रीय गायनाने होणार आहे. दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध तबला वादक पद्मश्री विजय घाटे यांच्या संकल्पनेतून साकार झालेला Melodic Rhythm हा कार्यक्रम साकार होणार आहे. तर शेवटच्या सत्रात आनंद गंधर्व आनंद भाटे हे पहिल्यांदाच या महोत्सवात पहिल्यांदाच आपले गायन सादर करणार आहेत.
दुसऱ्या दिवशी या कलाकारांचे सादरीकरण…
तर दुसऱ्या दिवसाची पहिल्या सत्राची सुरुवात विदुषी गौरी पाठारे यांच्या गायनाने होणार असून दुसऱ्या सत्रात आघाडीचे बासरी वादक प्रवीण गोडखिंडी यांचे बासरी वादन होणार असून त्यांना सत्यजीत तळवलकर यांची तबलासाथ असेल.
यंदा सशुल्क पूर्णोत्सव प्रवेशिका…
गेली दोन वर्ष कोरोनाचा काळ असल्याने संस्थेतर्फे सर्व नियमांचे पालन करून हा महोत्सव रसिकांसाठी विनामूल्य स्वरूपात सादर केला गेला होता. परंतु यंदा महोत्सवाच्या १ हजार आणि ५०० रुपयांच्या पूर्णोत्सव प्रवेशिका असणार आहेत. त्यातील काही प्रवेशिका संगीताचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरात कल्याण गायन समाजाच्या कार्यालयात उपलब्ध असल्याची माहिती चिटणीस प्रशांत दांडेकर यांनी दिली.
रियाझ या विषयावरील स्मरणिकेचे प्रकाशन…
तसेच दरवर्षी शास्त्रीय संगीतामधील एखादा विषय घेऊन त्यावर नामवंत कलाकार अथवा विचारक यांचे लेख असलेली स्मरणिका प्रकाशित केली जाते. त्याला अनुसरून यंदाही रियाझ या विषयावरील स्मरणिकेचे प्रकाशन ११ तारखेला होणार असल्याची माहिती स्मरणिकेचे संपादक अतुल वझे यांनी दिली.
कल्याण डोंबिवली आणि परिसरातील शास्त्रीय संगीतप्रेमी या महोत्सवाला भरभरून प्रतिसाद देतील अशी आशा महोत्सवाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध सर्जन डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केली आहे.