कल्याण दि.25 जानेवारी :
कैमिस्ट हृदयसम्राट, सेवापुरूष अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष, माजी विधान परिषद आमदार जगन्नाथ(आप्पा) शिंदे यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस संपूर्ण देशभर मोठया प्रमाणात साजरा होत आहे. त्यानिमित्त संपूर्ण देशभरात २४ जानेवारी रोजी झालेल्या रक्तदान संकलन आणि प्रतिज्ञा सोहळ्यात तब्बल ७५ हजारांपेक्षा अधिक रक्तदात्यांनी सक्रीय सहभाग नोंदवून आप्पांना ७५ व्या वाढदिवसाची गोड भेट दिली.
तर आप्पांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनकडून महालक्ष्मी लॉन्स कोथरूड पुणे येथे 75 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्याला उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमूख उपस्थितीत 5 हजार जनसमुदायाच्या साक्षीने 75 जोडप्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी प्रत्येक जोडप्याला एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र सोन्याची नथ चांदीची जोडवी संसार उपयोगी लागणारी सर्व भांडी वधू-वरांना तीन-तीन पोशाख देण्यात आले.
तर कल्याण शहरात आज सर्व सामाजिक संस्थांच्या वतीने आप्पांचा जीवनपट उलगडवणारी प्रकट मुलाखत सप्तकन्या मंगल कार्यालय कल्याण पूर्व येथे होणार आहे. या प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत.
तर 29 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता पोटे मैदान जिम्मीबाग कल्याण पूर्व येथे आप्पांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा, जगन्नाथ आप्पा शिंदे अमृत पर्व नागरी सत्कार सोहळा नियोजन समितीकडून आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रमूख नेते शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुनील तटकरे, भाजप कार्यकारी अध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, मंत्री हसन मुश्रीफ, दादा भुसे, प्रकाश आंबेडकर, खासदार बाळ्या मामा म्हात्रे तसेच समितीचे अध्यक्ष खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, स्वागत अध्यक्ष आमदार सुलभाताई गायकवाड यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.