कल्याण दि. 28 जुलै :
कल्याणातील बालक मंदिर संस्थेच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी अत्यंत देखण्या पध्दतीने आजची दिप अमावस्या साजरी केली. मराठी माध्यमाच्या शाळांनी जुन्या काळातील दिव्यांचे पूजन करून तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेने स्वातंत्र्याच्या 75 व्या दिनानिमित्त स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करत दिव्यांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.
प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीमधील सण – उत्सवांची निसर्ग आणि विविध ऋतुंशी घट्ट नाळ जोडण्यात आली आहे. इतर महत्वाच्या सणांपैकी एक महत्वाचा असणारा आजचा दिवस. आपल्या संस्कृतीमध्ये आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मोठे महत्व असून ही अमावस्या आपल्याकडे दिप अमावस्या म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही वर्षांत लोकांच्या मानसिकतेत झालेले बदल होऊन हा दिवस दिप अमावस्येऐवजी ‘गटारी ‘नावाने कुप्रसिद्ध झाला आहे. जणू काही एखादा राष्ट्रीय सण असावा अशा दृष्टीने लोकं त्याकडे पाहू लागले आहेत.
परंतू समाजातील हेच नकारात्मक विचार पुसून आपली मूळ संस्कृती आणि परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी बालक मंदिर संस्था गेल्या अनेक वर्षांपासून दिप पूजनाचा हा स्तुत्य उपक्रम राबवत आहे. बालक मंदिर संस्थेच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळेसह इंग्रजी माध्यमातील पूर्व प्राथमिक शाळेतर्फेही आज दीपोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी बालक मंदिर संस्थेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरून आणलेल्या विविध आकाराच्या व बहुरंगी पणत्या आणि दिव्यांची भव्य दिव्य अशी आरास करण्यात आली होती. तर भव्य अशी दिपमाळ, लामण दिवा, कंदील, चिमणी आदी जुन्या काळातील दिवेही आजच्या दिप अमावस्येनिमित्त प्रज्वलित करण्यात आले.
तर संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक शाळेतर्फे स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त क्रांतीकारकांच्या प्रतिमेसमोर दिवे प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. त्यासोबतच मिठाच्या माध्यमातून अत्यंत सुंदर अशी रांगोळीही काढण्यात आली होती.
यावेळी व्यवस्थापन मार्गदर्शक सर्वोत्तम केतकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना पवार, पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या. जोशी, कॅ. र. मा. ओक हायस्कूलच्या मुख्याध्यापिका माळी मॅडम, संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल पडवळ यांच्यासह शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.