
केडीएमसी शाळांतील 9-14 वयोगटातील विद्यार्थिनींचे होणार मोफत लसीकरण
कल्याण डोंबिवली दि.8 मार्च :
देशभरातील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हायकल कॅन्सरचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत चालले आहे. मात्र या जीवघेण्या आजाराला आळा घालण्यासाठी आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी पुढाकार घेतला आहे. मिशन रक्षा उपक्रमाअंतर्गत केडीएमसी शाळांतील 9 ते 14 वयाच्या 2 हजार विद्यार्थीनीना सर्व्हायकल कॅन्सरची मोफत लस दिली जाणार आहे. कल्याण पूर्वेच्या नेतीवली येथील प्रबोधनकार ठाकरे शाळेपासून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. (International Women’s Day: KDMC’s “Mission Raksha” initiative against cervical cancer)
बदललेल्या जीवनशैलीमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने चागलेच डोके वर काढले आहे. विशेषतः देशभरातील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हायकल कॅन्सरचा धोका चांगलाच वाढला असून आता कमी वयाच्या महिला किंवा तरुणींमध्येही त्याची लक्षणे दिसू लागली आहेत. तर विशेष म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात या आजारांवर झालेल्या संशोधनाने आजच्या घडीला या दोन्ही कॅन्सरवरील औषधे आणि अत्याधुनिक उपचार उपलब्ध झाले आहेत.
यासोबतच सर्व्हायकल कॅन्सरला रोखणारी लसही आज विकसित झाल्यामुळे महिलांमधील या वाढत्या आरोग्य समस्येला आळा घालणं शक्य झालं आहे. मात्र सर्व्हायकल कॅन्सरची ही लस सध्या तरी काहीशी महागडी असून ती सामान्य नागरिकांच्या आर्थिक आवाक्याबाहेर आहे. याच मुद्द्याचा विचार करून केडीएमसी शाळांमध्ये शिकणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलींनाही ही लस उपलब्ध होण्यासाठी केडीएमसी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. कल्याणातील एका खासगी कंपनीने दिलेल्या सीएसआर फंडातून केडीएमसी शाळांतील विद्यार्थिनींसाठी ही मोफत लसीकरण मोहीम राबवणे शक्य झाल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी यावेळी दिली. तसेच शिक्षण विभागाचे उपआयुक्त संजय जाधव आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपा शुक्ला यांनी या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतल्याचाही आयुक्तांनी यावेळी विशेष उल्लेख केला.
दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शाळांमधील 9 ते 14 वर्षांच्या मुलींचे या मिशन रक्षा उपक्रमाअंतर्गत मोफत लसीकरण केले जाणार आहे. केडीएमसी शाळांमध्ये आजमितीस या वयाच्या 2 हजार 10 विद्यार्थिनी शिकत आहेत. नेतिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे शाळेपासून मिशन रक्षाची सुरुवात झाली इथल्या 80 विद्यार्थिनींना आज ही लस देण्यात आली. तर येत्या काळात उर्वरित विद्यार्थिनींचेही लसीकरण करण्यात येणार आहे.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाला केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड, उपायुक्त संजय जाधव, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपा शुक्ला, इंडियन मेडीकल असोसिएशन कल्याणच्या अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर, डोंबिवली आयएमएच्या डॉ. नीती उपासनी, केडीएमसी शिक्षण अधिकारी विजय सरकटे, केडीएमसी आरोग्य विभागाचे डॉ. विनोद दौंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.