Home ठळक बातम्या कल्याणातील सुप्रसिद्ध के.सी.गांधी शाळेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पोर्ट्स टर्फचे उद्घाटन

कल्याणातील सुप्रसिद्ध के.सी.गांधी शाळेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पोर्ट्स टर्फचे उद्घाटन

आयुष्यातील अपयश पचवण्याची शक्ती खेळांतून मिळते – केडीएमसी उपायुक्त संजय जाधव

कल्याण दि.13 एप्रिल :
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खेळांची साथ महत्त्वाची आहे. कारण या खेळातूनच आपल्याला अपयश पचवण्याची शक्ती मिळत असते असे मत केडीएमसीचे शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी व्यक्त केले. (International standard sports turf inaugurated at the famous K.C. Gandhi School in Kalyan)

कल्याणातील सुप्रसिद्ध के. सी. गांधी शाळेमध्ये नव्याने बनवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बास्केटबॉल आणि फुटबॉल टर्फचे उद्घाटन उपआयुक्त संजय जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

 

आपण नेहमी म्हणतो की मुलांनी खेळलं पाहिजे. मात्र सध्याचे चित्र पाहिले तर पालकच आपल्या हातामध्ये तास न तास मोबाईल घेऊन बसलेले असून मुलं खेळणार तरी कशी? असा परखड सवालही त्यांनी यावेळी उपस्थित करत पालकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले.

तर राष्ट्रीय असो, राज्यस्तरीय असो की जिल्हास्तरीय स्पर्धा. कल्याणातील के.सी. गांधी शाळेच्या खेळाडूंनी त्यामध्ये नेहमीच लक्षणीय कामगिरी केलेली आपण पाहत आहोत. ही आपल्या सर्वांसह या शहरासाठी नक्कीच भूषणावह बाब असून हे शहरातील इतर शाळांनीही के.सी. गांधी शाळेचा आदर्श घेतला पाहिजे. आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी हे खेळच आपल्याला मदत करतात असेही संजय जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले.

के. सी. गांधी शाळेने आपल्या प्रशस्त प्रांगणात आपल्या विद्यार्थ्यांसाठी एकीकडे बास्केटबॉलचे सुंदर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे टर्फ निर्माण केले आहे. तर त्यालाच लागून शेजारी फुटबॉल टर्फची निर्मिती करण्यात आली आहे. जेणेकरुन या दोन्ही खेळांची आवड असलेल्या विद्यार्थ्यांना आता शहराबाहेर जाण्याची गरज पडणार नाही असा विश्वास यावेळी के. सी. गांधी शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष राजेश गांधी यांनी यावेळी व्यक्त केली.

या उद्घाटन समारंभाला कल्याण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेश गांधी, उपाध्यक्ष नरेश गांधी, सचिव मनोहर पालन यांच्यासह किशोर सोढा, मनोज शहा,भावेश गाला, भास्कर शेट्टी, अश्विन गांधी, क्रीडा समितीचे प्रमुख हेमंत जोशी, सदस्य सुनिल पाठारे, जायंटस क्लब फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. किशोर देसाई आणि विद्यार्थी – पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

दरम्यान या बास्केटबॉल कोर्टच्या उद्घाटन समारंभानंतर उपायुक्त संजय जाधव यांच्यासह शालेय व्यवस्थापन समितीतील अनेक वरिष्ठ सदस्यांनी बास्केटबॉल खेळासह आपल्या फिटनेसचे प्रात्यक्षिकही सादर केले. ज्याला उपस्थितांनी मोठी दाद दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा