प्रवाशांना आणखी एक सक्षम वाहतुक पर्याय
उपलब्ध करुन देत असल्याचा आनंद
मुंबई दि.14 मार्च :
मुंबई महानगर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर महानगरपालिकांसह अंबरनाथ आणि कुळगांव बदलापूर नगरपरिषद या क्षेत्रांसाठी एकत्रित परिवहन सेवा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे या परिसरातील लाखो नागरिकांना रेल्वेव्यतिरीक्त आणखी एक सक्षम सार्वजनिक वाहतूक पर्याय उपलब्ध करुन देत असल्याचा आनंद होतोय अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. (Integrated transport services for neighboring municipalities, municipalities including Kalyan Dombivli – Chief Minister Eknath Shinde’s decision)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन सेवा पूर्ण क्षमतेने नाहीत…
मुंबई महानगर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्राच्या नजिकच्या भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगरपरिषद व कुळगांव बदलापूर नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन सेवा उपक्रम पूर्ण क्षमतेने अस्तित्वात नाहीत. या क्षेत्रांमध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमांमार्फत बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. एकत्रित परिवहन सेवा क्षेत्र 225 चौरस किलोमीटर इतके मोठे असणाऱ्या या परिसराची लोकसंख्या सन 2011 जनगणनेनुसार एकूण 33,43,000 इतकी आहे. गेल्या 13 वर्षात या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्या तुलनेत पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचा शासन भर देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
शहाड येथे एकत्रित परिवहन उपक्रमाचे प्रशासकीय भवन…
भविष्यात एकत्रित परिवहन सेवेमुळे प्रवाशांना सुलभ व सहज वाहतूक सेवा रास्तदरात उपलब्ध होणार आहे. तसेच परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होणार असून यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षणावर शासनाचा भर आहे. या परिवहन सेवेत नवीन ईव्ही बसेस अंतर्भुत करण्यात येणार असल्याने शहरामधील हवा प्रदूषणाची पातळी नियंत्रित आणि कमी करणे शक्य होणार आहे. या परिवहन सेवेकरिता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये शहाड येथे एकत्रित परिवहन उपक्रमाच्या प्रशासकीय कार्यालयासाठी परिवहन भवन बांधण्यात येणार आहे.
एवढ्या विस्तृत परिसरासाठी एकत्रित परिवहन सेवेमुळे या भागातील विकासाला मोठी चालना मिळण्यास मदत होणार आहे. परिवहन सेवेतून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सेवा मिळू शकेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे.