कल्याण दि.5 मार्च :
कल्याण स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी (smart city) प्रकल्पांतर्गत सॅटिस (satis)प्रकल्प राबविण्यात येत असून त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका (kalyan dombivli municipal corporation) प्रशासन, ट्रॅफिक पोलीस, कल्याण आरटीओ आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे आज स्टेशन परिसराचा (kalyan station)पाहणी दौरा केला.
केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कल्याण पश्चिम स्टेशन परिसरात ‘सॅटिस’ प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मात्र हा प्रकल्प राबवण्यापूर्वी कल्याण स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅण्ड, फेरीवाला आणि पार्किंग प्रश्न सोडवण्याबाबत आज हा संयुक्त पाहणी दौरा करण्यात आला. यामध्ये कल्याण स्टेशन परिसरात पोलिसांचीच सुमारे 1 ते दीड हजार वाहने आढळून आल्याची माहिती केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी दिली. तर कल्याण तहसिल ऑफिसचा परिसर ताब्यात आल्यास इतर ठिकाणची वाहतूक व्यवस्था करण्यास सोयीचे ठरेल. तसेच फेरीवाल्यांमुळे रेल्वे स्टेशन परिसरात वाहतुकीला होणारा अडथळा दूर करण्याबाबतही लवकरच आवश्यक ते निर्णय घेण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
यावेळी केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्यासह कल्याणचे आरटीओ तानाजी चव्हाण, वाहतुक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सुखदेव पाटील, केडीएमटीचे परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट, स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनचे तरुण जुनेजा आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.