दर्जात्मक पद्धतीने खड्डे भरण्याचे कंत्राटदाराला निर्देश
कल्याण डोंबिवली दि.१० जुलै :
अवघ्या काही दिवसांच्याच पावसाने कल्याण डोंबिवलीतील रत्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसीच्या सिटी इंजिनिअर अर्जुन अहिरे यांनी (शहर अभियंता) आज कल्याण डोंबिवलीतील विवध प्रमूख रस्त्यांची पाहणी केली. तसेच पावसाने उघडीप दिल्याने रस्त्यांवर पडलेले खड्डे दर्जात्मक पद्धतीने भरण्याचे आदेश त्यांनी संबंधित कंत्रादारांना यावेळी दिले. तर या पाहणी दौऱ्यासाठी शहर अभियंता अहिरे यांनी पालिकेच्या चारचाकी गाडीऐवजी चक्क बाईकवरून केलेला प्रवास हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला.
पाऊस, केडीएमसी आणि रस्त्यांवरील खड्डे हे काही नविन समीकरण नाही. ‘ नेहमीची येतो पावसाळा ‘ या म्हणीप्रमाणे ‘नेहमीची येतो पावसाळा आणि केडीएमसीला मात्र रस्त्यांवरील खड्ड्यांचा लळा’ अशी काहीशी विचित्र मात्र सत्यपरिस्थिती दरवर्षी उद्भवते. यंदा तर पावसाला काहीशी उशिराने सुरुवात झाली असून गेले दोन आठवड्यांपासून सतत पाऊस कोसळत आहे. शहरांतील रस्त्यांवर खड्ड्यांचे चित्र याहीवर्षी तसेच कायम असल्याचे दिसत आहे.
पावसामुळे कल्याण असो की डोंबिवली या दोन्ही शहरातील विविध लहान मोठ्या रस्त्यांवर बऱ्यापैकी खड्डे पडले आहेत. ज्यातून वाट काढता काढता नागरिकांची दमछाक होत आहे.
आज सकाळपासून पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिली असल्याने केडीएमसी प्रशासनातर्फे रस्त्यांवरील खड्डे भरण्यास सुरुवात झाली आहे. खड्डे भरण्याचे हे काम व्यवस्थितरित्या सुरू आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी सिटी इंजिनिअर अर्जुन अहिरे यांनी आज पाहणी दौरा केला. कल्याण पश्चिमेच्या लालचौकी, आधारवाडी चौक, पारनाका, निक्की नगर आदी परिसरासह कल्याण पूर्व आणि डोंबिवलीमध्येही त्यांनी खड्डे भरण्याच्या कामांची पाहणी केली. तसेच पाऊस थांबला असल्याने हे खड्डे योग्य तसेच दर्जात्मक पद्धतीने भरण्याचे आदेशही त्यांनी यावेळी संबंधित कंत्राटदाराला दिले.
दरम्यान सिटी इंजिनिअर अर्जुन अहिरे यांनी केडीएमसीच्या चारचाकी गाडीऐवजी चक्क बाईकवर या सर्व रस्त्यांची पाहणी केली. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. महापालिका अधिकारी एसी केबिन आणि एसी गाडीशिवाय कुठेही बाहेर पडत नाहीत. या प्रतिमेला अर्जुन अहिरे यांनी छेद देत सामान्य नागरिकांना बाईकवर जाताना या खड्ड्यांचा किती त्रास होतो याचा जिवंत अनुभव या बाईकवरील दौऱ्याद्वारे घेतला. जो शहरात कुतूहलासह कौतुकाचा विषय ठरला.
यावेळी शहर अभियंता अर्जुन अहिरे यांच्यासह कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, उपअभियंता शाम सोनवणे, कनिष्ठ अभियंता संजय अचवले आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते.